हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्याना कारखान्यांकडून एफआरपीची रक्कम दिली जात नसल्याने याविरोधात राज्य सरकरांकडूनही काहीच कारवाई होत नसल्याचे दिसते. दरम्यान या विरोधात आता माजी मंत्री तथा रयत क्रांती शेतकरी सन्घटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. 5 ऑक्टोबर पासून सोलापूर जिल्ह्यातून राज्य सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा खोत यांनी दिला आहे.
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याचा थकीत एफआरपीचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या विरोधात शेतकऱ्याकडून अनेकवेळा आंदोलने देखील करण्यात आलेली आहे. त्याकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याने या विरोधात आता शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातून “जागर एफआरपीचा, एल्गार ऊस उत्पादकाचा” या आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचा इशारा आज दिला.
याबाबत सदाभाऊ खोत म्हणाले की, एफआरपीच्या तीन तुकड्यांचा प्रस्ताव राज्य सरकारनेच दिला आहे. याआधी सहकार मंत्र्यांच्या दारात आंदोलन करणारे आता गप्प का आहेत? असा सवाल उपस्थित करीत खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावरही टीका केली. राजू शेट्टी यांचे आंदोलन म्हणजे फक्त नौटंकी आहे. त्यांच्या आंदोलनामुळे काहीही होणार नसल्याचे खोत यांनी यावेळी सांगितले.