Saturday, June 3, 2023

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराला 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक बढया नेत्यांना अनेक गुन्ह्यामध्ये शिक्षेला सामोरे जावे लागले आहे. मात्र, आता या नेत्यांमध्ये आणखी एका नेत्याला आज तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यवतमाळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते तथा माजी आमदार राजू तोडसाम यांना न्यायालयाने 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

माजी आमदार राजू तोडसामयांच्या एका प्रकरणावर आज पांढरकवडा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला. राजू तोडसाम यांच्यावर शासकीय मालमत्तेचे नुकसान करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. राजू तोडसाम हे आदिवासी विकास सेलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून पांढरकवडा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश प्रदीप नाईकवाड यांनी याबाबत निकाल दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे यवतमाळ येथील नेते राजू तोडसाम यांनी 29 नोव्हेंबर 2013 मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत हिंसक आंदोलन केले होते. यावेळी बाजार समितीच्या कार्यालयाची तोडफोड व जाळपोळ प्रकरणी माजी आमदार राजू नारायण तोडसाम यांच्यासह नंदकिशोर पांडुरंग पंडित, विकेश विठ्ठल देशट्टीवार, किशोर हरिभाऊ घाटोळ, सुधीर माधवराव ठाकरे, नारायण बाबाराव भानारकर या सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान यवतमाळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी बी नाईकवाड यांनी तीन वर्षे सक्त मजुरी आणि 12 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.