नवी दिल्ली । देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉक्टर मनमोहन सिंह यांना दोन दिवसापूर्वी अचानक छातीत दुखू लागल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. आज मंगळवारी उपचारानंतर मनमोहन सिंह यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ताप आणि छातीत दुखू लागल्याने 87 वर्षीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना रविवारी संध्याकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.
Former Prime Minister Dr Manmohan Singh has been discharged from AIIMS, Delhi on medical advice: AIIMS official pic.twitter.com/hcJSbGDVrT
— ANI (@ANI) May 12, 2020
डॉ. मनमोहन सिंह यांना कार्डिओ-थोरॅसिक वॉर्डमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. मात्र चिंता करण्याचं कारण नसल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितलं जात होतं. उपचारादरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची कोरोनाची तपासणी देखील करण्यात आली असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची 2009 मध्ये कोरोनरी बायपास सर्जरी करण्यात आली होती. त्यावेळी जवळपास 14 तास ही शस्त्रक्रीया सुरु होती.
मनमोहन सिंह रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळताच सर्वांनीच त्यांची प्रकृती ठिक व्हावी यासाठी प्रार्थना सुरु केली होती. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली होती. देशातील बड्या राजकीय नेत्यांनीही ट्वीट करुन मनमोहन सिंह यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”