हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष तसेच जळगाव शहरातील प्रमुख नेते हाजी गफ्फार मलिक यांचं सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातील अनेकांना धक्का बसला. राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
शरद पवारांनी व्यक्त केले दुःख
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील गफ्फार यांच्या निधनाच्या वृत्ताने तीव्र दुःख झाल्याचं म्हटलं आहे त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून ट्विट केले आहेत. त्यामध्ये म्हटले आहे की ,”राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे माजी राज्यप्रमुख हाजी डॉ. अब्दुल गफ्फार मलिक यांचे निधन दुःखदायक आहे.मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य राहिलेल्या डॉ. गफ्फार मलिक यांनी मुस्लीम मणियार बिरादरी तसेच तालिम-ए-अंजुमन व इकरासारख्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील मुस्लीम युवक-युवतींच्या उच्चशिक्षणासाठी व औद्योगिक प्रशिक्षणासाठी आयुष्यभर अथक परिश्रम केले.
राजकीय क्षेत्रातील संयत तरीही आग्रही नेतृत्व त्यांच्या जाण्याने हरपले. त्यांच्या कुटुंबियांप्रति सहसंवेदना व भावपूर्ण श्रद्धांजली!” अशा आशयाचे ट्विट करीत गफ्फार यांच्या निधनाबद्दल पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे.
मलिक यांच्या विषयी …
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ते राज्याच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचा राष्ट्रवादितील प्रवास आहे. शरद पवार यांच्या सांगण्यावरून रावेर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होते. मात्र अवघ्या काही मतांच्या फरकामुळे त्यांचा पराभव झाला होता. संपूर्ण जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी अग्रेसर राहण्यासाठी त्यांचे मोठे योगदान असून पक्ष वाढीकरिता त्यांनी परिश्रम घेतले होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षात ख्याती होती. राष्ट्रवादीच्या पडत्या काळात मलिक यांना अनेक पक्षातून बोलावून आलं होतं. मात्र त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी सोबत ची निष्ठा राखली.