सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
साताऱ्यात बॉम्बे रेस्टॉरंट येथे फळ विक्रेत्यांवर कोयत्याने झालेल्या हल्याची घटना ताजी असताना अजून एक कोयत्याने सपा सप वार केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. क्षेत्रमाहूली येथील माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष जाधव यांच्यावर अज्ञात इसमांनी अचानक कोयत्याने हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, क्षेत्रमाहूली येथील माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष जाधव त्यांच्या घरामध्ये बसले होते. यावेळी संतोष जाधव यांची दोघेजण पूर्वीच्या वादातून माफी मागायला म्हणून आले होते. माफी मागण्या ऐवजी आरोपींनी जाधव यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये जाधव यांच्या डोक्याला जखम झाली. त्यानंतर संबधित हल्लेखोर तेथून पळून गेले. या घटनेबाबत नागरिकांनी सातारा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
तोपर्यंत नागरिकांनी संतोष जाधव यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, या घटनेनंतर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तातडीने संशयितांना पकडण्याचे पोलिसांना आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी माहुली परिसरातून काही मिनिटांतच दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलीस त्यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, हल्ल्यामागील कारण स्पष्ट झाले नाही. सातारा शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झालेली नव्हती. या घटनेचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.