चर्चा तर होणारच, भोसरे गावात एकाच घरातील चौघेजण ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. १५ जानेवारी २०२१ रोजी महाराष्ट्रातील हजारो गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होईल. या निवडणुकीत एक आगळाच प्रयोग खटाव तालुक्यातील भोसरे या गावात पहायला मिळाला आहे. गावातील सत्ताधारी आणि विरोधी हे दोन्ही पक्ष गावातील महत्त्वाच्या प्रश्नांवर गप्प बसतात, भ्रष्टाचार झाला तरी त्यासंदर्भातील व्यक्तीला पाठीशी घालतात, सामान्य जनतेचं म्हणणं विचारात न घेताच परस्पर मनमानी कारभार करतात अशा समस्यांचा पाढा गावातील कृष्णा हणमंत जाधव आणि कुटुंबियांनी वाचला आहे. ठराविक लोकांच्या वर्षानुवर्षे चाललेल्या मनमानी वागण्याला कंटाळून कृष्णा हणमंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबातील इतर तिघांनी ग्रामपंचायत निवडणुकीत उडी घेतली आहे.

सामान्य शेतकरी कुटुंबातील असलेले कृष्णा हणमंत जाधव, त्यांच्या पत्नी मंजुषा कृष्णा जाधव, कृष्णा यांचे बंधू संजय हणमंत जाधव आणि त्यांच्या पत्नी संतोषी संजय जाधव या चौघांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आपला अर्ज भरला आहे. हनुमान जनशक्ती संघटनेतर्फे त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. हनुमान वॉर्ड क्रमांक १ मधून कृष्णा जाधव, संतोषी जाधव यांनी, धनाजी वॉर्ड क्रमांक २ मधून संजय जाधव यांनी तर आंबेडकर वॉर्ड क्रमांक ३ मधून मंजुषा जाधव यांनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे.

आता या निवडणुकीत या चौघांपैकी कितीजण निवडून येतात, कोणकोण कशी लढत देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. गावातील लोकांमध्ये या कुटुंबाविषयी आपुलकी आणि आस्था असल्याने सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षातील उमेदवारांनी या कुटुंबाची धास्ती घेतल्याचं चित्र गावात पाहायला मिळत आहे.

“खरंतर राजकारण हा आमचा पिंडच नाही. रानात रोजचं कष्ट करुन आपलं पोट भरणं एवढंच काम आम्ही आतापर्यंत केलं. पण लोकशाही व्यवस्थेत सामान्य माणसाचं म्हणणं ऐकून घेतलं जात नसेल तर निवडणूक लढवून आपणच जनतेचं प्रतिनिधी बनणं हाच शेवटचा पर्याय उरतो.” – मंजुषा कृष्णा जाधव

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment