नवी दिल्ली । भारताची सामरिक शक्ती वाढवणारं लढाऊ विमान राफेल चीन-पाकिस्तानच्या छातीत धडकी भरण्यासाठी आता भारतात दाखल होणार आहे. जुलै अखेरपासून भारतात राफेल फायटर विमाने दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात फ्रान्सकडून ४ राफेल फायटर विमाने मिळणार आहेत. भारताने फ्रान्सबरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. राफेलच्या समावेशामुळे इंडियन एअर फोर्सची हवाई हल्ला करण्याची क्षमता कैकपटीने वाढणार आहे. तसेच भारतीय सीमेच्या हद्दीत राहून शत्रूला चोख उत्तर देण्याच्या या क्षमतेमुळे भारतासाठी राफेल हे ब्रम्हास्त्रापेक्षा कमी नसणार आहे.
दरम्यान, मे अखेरपर्यंत राफेल विमाने भारताला मिळणार होती. पण कोरोना व्हायरसच्या संकटामुळे दोन महिने उशिराने ही विमाने एअर फोर्सच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. पहिल्या चार विमानांपैकी तीन दोन आसनी ट्रेनर तर एक सिंगल सिटर फायटर विमान असेल. भारतीय हवाई दलाचे प्रमुख आर.के.एस भदौरिया यांच्या सन्मानार्थ ट्रेनर विमानांच्या शेपटीकडच्या भागावर आरबी सीरीजचा नंबर असेल. कारण भदौरिया यांनी या कराराला अंतिम स्वरुप देण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे.
भारतात येण्यासाठी या विमानाने फ्रान्समधून उड्डाण केल्यानंतर सर्वप्रथम मिडल इस्टमध्ये हे विमान थांबेल. त्याआधी फ्रेंच एअर फोर्सकडून हवेमध्येच या विमानामध्ये इंधन भरण्यात येईल. मिडल इस्टमधून निघाल्यानंर इंडियन एअर फोर्सच्या IL-78 टँकर एअर क्राफ्टमधून हवेमध्ये इंधन भरण्यात येईल. राफेल फ्रान्सवरुन थेट भारतात येऊ शकते. पण १० तासांच्या या प्रवासात छोटया कॉकपीटमध्ये इतका वेळ बसणे वैमानिकाला त्रासदायक ठरु शकते. या विमानामुळे भारताला हवाई वर्चस्व मिळवता येणार आहे. सध्या तरी चीन आणि पाकिस्तानकडे राफेलच्या तोडीचे कुठलेही दुसरे विमान नाही आहे. म्हणूनच भारतीय आकाशात राफेल झेप घेताच येणाऱ्या काळात चीन आणि पाकिस्तानची झोप उडणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”