चारचाकी कार चोरणार्‍या टोळीचा गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून पर्दाफाश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

इस्लामपूर शहरातील चारचाकी कार चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केला आहे. चोरी प्रकरणातील राजू बाबूराव जावळकर याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून बोलेरो व चारचाकी कार हस्तगत करण्यात आली. चोरटयाचे दोघे साथीदार फरार झाले आहेत. 31 जानेवारी रोजी इस्लामपूर-आष्टा नाका परिसरातील भास्कर मोरे यांच्या माणेकश्वर मोटर गॅरेजमध्ये लावलेली बोलेरो कार ही अज्ञात चोरटयांनी चोरून नेली होती.

याबाबतची फिर्याद भास्कर मोरे यांनी इस्लामपूर पोलिसात दिली होती. पोलिसांनी इस्लामपूर शहरातील सीसीटिव्हीची सखोल माहिती घेतली. आरोपी पेठच्या दिशेने जावून पुणे जिल्हयातील खेड-शिवापूरच्या दिशेने गेल्याचे फुटेजमधून दिसून आले. तेथील रामनगर परिसरात गस्त घालताना राजू जावळकर यास ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने कोल्हापूर जिल्हयातील गांधीनगर, सांगली व सातारा शहरातून साथीदार नितीन शामराव समुद्रे, अंगत पुणवत यादव यांच्या मदतीने 5 गुन्हयांची कबूली दिली.

राजू जावळकर यास अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता 15 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. फरार आरोपी नितीन समुद्रे व अंगत यादव यांचा कसून तपास सुरू आहे. या टोळीकडून राज्यातील आणखी काही गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे.