औरंगाबाद | चितेगाव येथून एका चार वर्षीय मुलीचे भीक मागण्यासाठी अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर पोलिसांनी दोन दिवसात तपास लावून मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला शुक्रवारी अटक केली आहे. जानवी अनिलकुमार कुसवाह (रा. चिपळूण, ह.मु. रेल्वेस्टेशन औरंगाबाद) असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे.
यासंदर्भात जयश्री चव्हाण (वय 25, रा. चितेगाव ता. पैठण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची चार वर्षीय मुलगी गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास राहत्या घरासमोर खेळत असताना अज्ञात व्यक्तीने पळून नेले होते. याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही मुलगी मूळ उत्तर प्रदेश राज्यातील असल्याने तिला स्पष्ट मराठी बोलता येत नव्हती.
त्यानंतर पोलिसांनी शोध घेण्याकरिता या मुलीचा फोटो व माहिती परिसरात लाऊडस्पीकरद्वारे अनाउन्सिंग केली. त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजेदरम्यान सपोनि माने यांना खबऱ्याकडून या मुलीबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथे भीक मागणाऱ्या जानवी अनिल कुसवाह हिच्या ताब्यातून घेतले. व सदर मुलीला बिडकीन येथे आणण्यात आले. सदर मुलीला पळवून का नेले याबाबत विचारपूस केली असता पीडित मुलीला भीक मागण्यासाठी पळून आणल्याची कबुली महिलेने दिली. यावरून आरोपी महिलेविरोधात बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.