पाटण | ठाणे येथे स्थापन झालेल्या कालिकाई व संपर्क ॲग्रो मल्टिस्टेट को. ऑ. सो. या मल्टिस्टेट कंपनीने मुंबई, ठाणे, कोकण पश्चिम महाराष्ट्रसह पाटण तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे पुढे आले आहे. या फसवणूक प्रकरणी गुंतवणूक प्रतिनिधी सुमा गौतम माने (रा. कडवे ता. पाटण) व सुनिल तुकाराम कदम (रा. पाटण) यांनी कंपनीचे संचालक मंडळा विरोधात जिल्हा पोलिस प्रमुख सातारा व पोलिस स्टेशन पाटण येथे तक्रार दाखल केली असून या तक्रारीची दखल जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी घेतली असून पुढील कारवाईचे आदेश अर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा सातारा यांना केले आहेत.
या बाबत श्रीमती सुमा गौतम माने यांनी दिलेल्या तक्रारीत पुढे म्हणल्या आहेत की, कालिकाई इंडस्ट्रीज इंडिया लि. आणि संपर्क अॅग्रो मल्टीस्टेट को. ऑपरिटिव्ह सोसायटी लि. ठाणे या एकच फर्म असलेल्या कंपनीने ग्रामीण भागातील गोरगरीब लोकाना अर्थिक गुंतवणूकीच्या दीडपट डबल, तिप्पट परतावा देण्याचे अमिष दाखवून या कंपनीचे जितेंद्र रामचंद्र यादव (रा. केर ता. पाटण जि. सातारा, सध्या- मुंबई) व महिपती गोविंद जगदाळे (रा. पाटण ता. पाटण जि. सातारा) याच्या मार्फत पाटण येथे ऑक्टोंबर 2012 पासून ते 218 अखेर आर्थिक गुंतवणूकीचा व्यवसाय सुरु केला. यामध्ये कंपनीने तीन वर्ष, पाच वर्ष, सात वर्ष, नऊ वर्ष मुदत्तीवर आर्थिक गुंतवणूकीसाठी लोकांचा विश्वास संपादन करून रोख रक्कम गोळा करण्यास सुरुवात केली.
यासाठी कंपनीचे कोअर कमिटी सदस्य जितेंद्र रामचंद्र यादव व महिपती गोविंद जगदाळे यांच्याबरोबर कंपनीचे चेरमन- अरुण आर. गांधी, व्यवस्थापक संचालक- हेमंत गणपत रेड्डीज, व्यवस्थापक संचालक- मानसी हेमंत रेड्डीज, उत्पादन विभाग प्रमुख- आदित्य हेमंत रेड्डीज, प्रकल्प अधिकारी – अभिनंदन अरुण गांधी, प्रकल्प वि. अर्थ संचालक- विनायक रामचंद्र गावणंग, संचालक-विजय रविंद्र पाथरे, कमलाकर गंगाराम गोरिवले, अविनाश डांगळे आदी सर्व वरिष्ठ पाटण येथे येवून कंपनी संदर्भात माहिती देवून या कंपनीत लोकांना आर्थिक गुंतवणूक करण्यास भाग पाडत होते. यासाठी पाटण येथे सुरवातीला भाडेतत्वावर, कालांतराने स्वमालकीचे कार्यालय सुरु केले. या माध्यमातून कंपनीत मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध असल्याचे भासवून अनेक सर्वसामान्य लोकांना काही कमिशन वर गुंतवणूक प्रतिनिधी नेमण्यात आले. या प्रतिनिधींच्या मार्फत मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रसह पाटण तालुक्यातील हाजारो लोकांची कोठ्यावधी रुपयांची अर्थिक गुंतवणूक या कंपनीत करून घेतल्याचे तक्रारीत म्हणले आहे.
कालिकाई संपर्क सेवा समिती (फोरम) कमिटीचे सचिव राजेश सावंत यांनी मुंबई अर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे दिलेल्या तक्रारीत म्हणले आहे की, चिपळूण तालुक्यात प्रथम कालिकाई इंडिया (ई) लिमिटेड ही संस्था स्थापन करण्यात आली. नंतर याच संस्थेला चक्क राष्ट्रीय दर्जा देण्याच्या नावाखाली २०१४ साली संपर्क ॲग्रो मल्टिस्टेट को.ऑ.सो.अशी राष्ट्रीयकृत नोंदणी करण्यात आली. त्यानंतर नव्या योजनेने कामकाज सुरू करण्यात आले. राष्ट्रीयकृत आणि शेतीविषयक संस्था असल्याने गुंतवणूकदारांनी मोठी पसंती या मल्टिस्टेट कंपनीला दिली. चिपळूणसह, कोकण पश्चिम महाराष्ट्र मुंबईपर्यंत हजारो जणांनी या कंपनीत गुंतवणूक केली. या कंपनीचा कारभार मुंबईतील वडाळा येथील कार्यालयातून सुरू करण्यात आला. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना पैसे मिळाले. नंतर मात्र अनेक मल्टिस्टेट कंपन्यांसारखी परिस्थिती निर्माण झाली. गुंतवणूकदारांचे पैसे देता येत नसल्याने संचालक मंडळाने चालढकल सुरू केली आहे.