वाई | परदेशातून येणाऱ्या स्वस्तातील सोन्यात पैसे गुंतविल्यास जादा फायदा देण्याच्या बहाण्याने 7 ते 8 जणांची तब्बल 74 लाखांची फसवणूक केल्याची तक्रार भुईंज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अमर सदाशिव कडव (रा.वारागडेवाडी, भुईज) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी राहुल ऊर्फ पप्पू बजरंग मोरे (रा. विजयनगर, भुईंज) व पल्लवी अत्माराम घाडगे (रा. फ्लॅट नं २०६, तिसरा मजला, बी विंग, चिंतामणी विहार, जानवली, ता. कणकवली) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भुईंज येथील राहुल ऊर्फ पप्पू मोरे याने ‘माझी भाची पल्लवी हिचा गोल्ड ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. त्यात पैसे गुंतवले, की तुम्हाला परतावा मिळेल. एक तोळ्याचा दर असेल तो गुंतवला तर 40 दिवसांत प्रत्येक तोळ्यामागे पाच हजार रुपये मिळतील. दहा तोळ्यांवर गुंतवणूक केल्यास महिन्याला 50 हजार रुपये मिळणार, अशा प्रकारे आमिष दाखवून सात ते आठ जणांकडून लाखो रुपये जमा केले. अनेकांनी त्यांच्या बँक खात्यावर एनईएफटी व आरटीजीएसद्वारे पैसे पाठविले. प्रथमदर्शनी काही लोकांना गुंतवलेल्या प्रमाणात पैशाचा परतावाही केला.
मात्र, गुंतवणुकीचा आकडा वाढल्यानंतर संबंधितांनी पैसे देण्याचे बंद केल्याने गुंतवणूकदारांनी मोरेस विचारणा केली. त्या वेळी त्यानेही उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. गेल्या सहा महिन्यांपासून या गुंतवणूकदारांनी अनेक वेळा पल्लवी व राहुल यांना पैसे मागितले. मात्र,त्यांनी पैसेही दिले नाहीत. त्यांनतर पल्लवी ही फरारी झाली, तर राहुलला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिवाजी तोडरमल तपास करीत आहेत.