कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सन २०२० मध्ये सर्व जगात कोरोनाने थैमान घातले. संपूर्ण जगात उलथापालथ झाली. २०२१ च्या सुरवातीला या आजाराला सध्या तरी उतरती कळा सुरू झाली आहे. तसेच लवकरच लस येण्याची आशा आहे. पण या कोरोनाच्या काळात जगभरात कॅन्सरच्या रूग्णांना मात्र अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या काळात काहींनी निदान करण्याचे टाळले. तर काहींनी उपचार घेतले नाही अथवा उपचार पूर्ण करू शकले नाहीत. यामुळे अचानकपणे कर्करोग रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्याचे दिसून आले आहे.
आज भारतात मृत्यूचे दुसरे कारण म्हणजे कॅन्सर. दरवर्षी कॅन्सरचे १० लाख नवीन रूग्ण आढळतात आणि त्यामुळे ४ लाख मृत्यू होतात. जगात सर्वाधिक तोंडाच्या व घशाच्या कॅन्सरचे रूग्ण भारतात आहेत. कृष्णा हॉस्पिटलमध्ये गेल्या २५ वर्षापासून कर्करोग विभाग कार्यरत आहे. सन १९९६ मध्ये सातारा जिल्ह्यात प्रथमच व पश्चिम महाराष्ट्रात मिरजनंतर कराड येथे स्वतंत्र कर्करोग विभाग कृष्णा हॉस्पिटलमध्ये सुरू झाला. आज या विभागात दररोज जवळपास १०० रूग्ण उपचार घेतात. मागील २० वर्षात जवळपास ३० हजार हून अधिक रूग्णांनी येथे उपचार घेतलेले आहेत. सर्वाधिक रूग्ण तपासणारे व सर्वाधिक रेडिएशन किमोथेरपी देणारे दक्षिण महाराष्ट्रातील हे एकमेव रूग्णालय आहे. येथे पूर्णवेळ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संस्थांमधून प्रशिक्षित कॅन्सर सर्जन, रेडिएशन व किमोथेरपी तज्ज्ञ उपलब्ध आहेत. तसेच स्तन कर्करोगासाठी स्वतंत्र विभाग आहे. पॅलिएटीव्ह केअरसाठी पश्चिम महाराष्ट्रातील ही एकमेव संस्था मान्यताप्राप्त आहे. हा विभाग टाटा हॉस्पिटलच्या नॅशनल कॅन्सर ग्रीड शी संलग्न आहे. येथे महात्मा फुले जीवनदायी योजना, पोलिस आरोग्य कल्याण योजना, मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधी इत्यादी योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते.
याशिवाय कृष्णा हॉस्पिटलतर्फे विविध ठिकाणी कर्करोग निदान व उपचार शिबीरे भरविली जातात. तसेच विविध जनजागृती अभियानेही चालविली जातात. याच अनुषंगाने दरवर्षी ४ फेब्रुवारीला कृष्णा हॉस्पिटलतर्फे जागतिक कर्करोक दिनानिमित्त विविध राबविले जातात.
या दिनाचे औचित्य साधून यावर्षी दि. ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान कर्करोग विभागातर्फे भव्य मोफत कर्करोग शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीराला भारतीय कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञांची संघटना आणि गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक (गोकर्मा) या संघटनेनी मान्यता दिली आहे. यामध्ये देशभरातील उच्च वैद्यकीय संस्थांमधील सुमारे २० हून अधिक कर्करोग तज्ज्ञ कृष्णा हॉस्पिटलमध्ये स्वत: उपस्थित राहून मोफत शस्त्रक्रिया करणार आहेत. या शिबीरासाठी कर्करोगावरील तज्ज्ञांच्या जागतिक पातळीवरील संघटना असणाऱ्या यु.आय.सी.सी.चे अध्यक्ष तथा मुंबईतील अपोलो हॉस्पिटलचे संचालक व टाटा हॉस्पिटलचे माची संचालक डॉ. अनिल डिक्रुज, भारतीय कॅन्सर शस्त्रक्रिया तज्ज्ञांच्या असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अर्नब गुप्ता (कोलकता), मुंबईतील एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटचे सहाय्यक संचालक डॉ. धैर्यशील सावंत, ब्रिज कॅन्डी व जसलोक हॉस्पिटलचे कॅन्सर सर्जन डॉ. अमिश दलाल, बेंगलोर येथील मणिपाल हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. सोमशेखर, टाटा हॉस्पिटलमधील कॅन्सर विभागाचे प्रमुख डॉ. प्रथमेश पै, गोवा येथील मणिपाल हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. शेखर साळकर, हुबळी येथील कर्नाटक कॅन्सर थेरपी व रिसर्च इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ. बी. आर. पाटील, रेडॉन कॅन्सर सेंटरचे संचालक डॉ. संजीव कुलगोड, बेंगलोये येथील मेक्झिलोफेसिअल सर्जन डॉ. सत्यजीत दंडगी, शिमोगा येथील कॅन्सर सर्जन डॉ. रमेश हे ख्यातनाम कॅन्सर तज्ज्ञ प्रमुख उपस्थित राहणार आहेत. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सर्व कॅन्सर सर्जनचाही यात समावेश असणार आहेत. शिबीरातील शस्त्रक्रिया डॉ. शेखर साळकर (गोवा) व डॉ. शरद देसाई (मिरज) यांच्या निर्देशानुसार होणार आहेत.
या शिबीराचा लाभ घेण्यासाठी कॅन्सरग्रस्त रूग्णांनी २५ जानेवारी अखेर कृष्णा हॉस्पिटलमध्ये नोंदणी करणे गरजेचे असून, नोंदणीसाठी येताना रूग्णांनी आपले सर्व जुने रिपोर्टस् घेऊन यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.