हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे महापूर आला तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने अनेक ठिकाणी लोकांचा मृत्यू झाला. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे काम चालू असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. महापुरामुळे अनेक ठिकाणी घरे, शेती आणि रस्ते वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी घरे अजूनही पाण्याखाली आहेत. अशा पूरग्रस्तांना मदत म्हणून राज्य शासनाकडून मोफत अन्न-धान्य आणि केरोसीनचे वाटप केले जाणार असल्याची माहीती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू, १० किलो तांदूळ, ५ लिटर रॉकेल मोफत देण्यात येणार आहे. यासंदर्भातला शासकीय आदेश मार्च २०१९ला काढण्यात आला आहे. त्यात थोडा बदल करून ज्यांना गहू नको असेल, त्यांना तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकणात प्रामुख्याने भाताचा समावेश जेवणात असतो. त्यामुळे तांदूळ देखील पुरवले जातील. यासोबतच तिथे उपलब्ध असलेली किंवा लोकांच्या आहारात असलेली ५ किलो डाळ देखील पुरवण्याचा निर्णय झाला आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
पुरपरिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यात लाईट नाही अशा ठिकाणी मोफत केरोसीनचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्याठिकाणी शिवभोजन केंद्र वाहून गेले आहे किंवा पाण्यात आहे तेथे इतर ठिकाणावरून शिवभोजनाचे पाकिटे वितरीत करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पाकिटांच्या वितरणासाठी त्याचप्रमाणे लाईट नसलेल्या ठिकाणी किंवा शिवभोजन अँपसाठी कनेक्टिव्हिटी नसलेल्या ठिकाणी थाळीच्या नोंदणीसाठी स्थानिक पातळीवर तहसीलदारांनी त्यांच्या यंत्रणेचा वापर करावा अशा सूचनाही मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.