‘त्यांना अशी शिक्षा करू कि…’ हाथरस प्रकरणावर योगी आदित्यनाथ यांनी अखेर सोडलं मौन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर चहुबाजूंनी टीका होत आहे. हाथरास प्रकरणात पीडितेच्या उपचाराबाबत हलगर्जीपणा आणि कारवाईत केलेली दिरंगाई यामुळं योगी सरकार टीकेचे धनी बनले आहे. इतकेच नव्हे तर या प्रकरणामधील पीडित तरुणीच्या नातेवाईकांना तिच्यावर अंत्यसंस्कारही करुन न दिल्याने देशभरामध्ये आक्रोश व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेला घडून २० दिवस होऊनही मुख्यमंत्री योगी यांनी मौन बाळगलं असताना त्यांनी आता आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

योगींनी ट्विटरवरुन पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ते म्हणाले कि, ”उत्तर प्रदेशमधील सर्व आया-बहिणींच्या सन्मानाला आणि स्वाभिमानाला छेडण्याचा प्रयत्न करण्याचा विचारही करणाऱ्याचा नाश निश्चित आहे. त्यांना अशी शिक्षा केली जाईल की भविष्यात याकडे उदाहरण म्हणून पाहिलं जाईल, तुमचे उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणीची सुरक्षा आणि विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प आहे आणि वचनही आहे,” असं योगी यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.

हाथरसमधील हे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वच विरोधकांनी योगी सरकारवर टीकेचा भडीमार केला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी गुरुवारी पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन हाथरसमध्ये जाण्यास परवानगी दिली नाही. हाथरसमध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. यामुळेच काँग्रेसविरुद्ध भाजपा असा थेट संघर्ष या प्रकरणावरुन झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसबरोबरच आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, शिवसेना यासारख्या भाजपाविरोधी पक्षांनी या प्रकरणावरुन योगी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment