आरक्षणासाठी सरकारला वेठीस धरण्याकरिता विद्यार्थ्यांचा वापर करणे योग्य नाही- प्रवीण गायकवाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । येत्या रविवारी एमपीएससी परीक्षांचे आयोजन लोकसेवा आयोगाने केले आहे. मात्र, मराठा समाजाने ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्यात कोणत्याही प्रकारची नोकर भरती प्रक्रिया होऊ नये, असा आग्रह मराठा समाजाने धरला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, सरकारला वेठीस धरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान वेळापत्रकानुसारच परीक्षा घ्यावी अशी मागणी करत संभाजी ब्रिगेड परीक्षा केंद्रांना संरक्षण देईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

मराठा आरक्षण मिळत नाही आणि यावर तोडगा निघत नाही. तोपर्यंत पोलीस भरती रद्द करावी आणि एमपीएससी परीक्षा घेऊ नये, अशी मराठासमाजाकडून मागणी होत आहे. दरम्यान, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसोबत एमपीएससीच्या सर्व विद्यार्थ्यांकडून परीक्षा घेण्यात यावी, असे आवाहन केले आहे. आम्ही अभ्यास केला आहे. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र, आमचे वर्ष वाया जाईल, असे सांगत परीक्षा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

मराठा समाजाला परीक्षा द्यायला लावून उद्रेकाची वाट पाहू नका!- खासदार छत्रपती उदयनराजे
‘राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असताना तसेच मराठा आरक्षण स्थगितीचा निर्णय आलेला असतानासुद्धा सरकारला एमपीएससीची परिक्षा घेण्याची एवढी घाई का? असा सवाल खासदार छत्रपती उदयनराजे यांनी फेसबुक पोस्ट करत उपस्थित केला आहे. तर, मराठा समाज जितका संयमी आहे, तितकाच तो आक्रमकही आहे. यांची जाणीव ठेवून सरकारने एमपीएससीच्या परीक्षेसाठी संपूर्ण मराठा समाजाला परीक्षा द्यायला लावून उद्रेकाची वाट पाहू नका,’ असा सूचक इशाराही उदयनराजे यांनी दिला आहे.

.. म्हणून एमपीएससी परीक्षांना विरोध- खासदार छत्रपती संभाजीराजे
राज्यात सध्या एमपीएससी परीक्षांना काही मराठा संघटना तसंच काही परीक्षार्थ्यांकडून विरोध होत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्याशिवाय लोकसेवा आयोगाची परीक्षा घेऊ नये, अशी त्यांची भूमिका आहे. तर दुसरीकडे दलित संघटनांसह इतरांनी परीक्षेसाठी आग्रह धरला आहे. परंतु लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला विरोध केवळ कोरोनामुळे करत असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं. कोरोना कमी झाल्यावर परीक्षा घ्यावी, असंही संभाजी राजेंनी सांगितलं. मात्र आधीच्या नियुक्त्या का दिल्या नाहीत, असा प्रश्नही संभाजीराजे यांनी विचारला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment