भाजपला जास्त मस्ती आली आहे, त्यांना धडा शिकवणारचं; जयसिंगराव गायकवाडांचा निर्धार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । भाजपला जास्त मस्ती आली आहे आणि त्यांना मी धडा शिकवणारच, असा निर्धार जयसिंगराव गायकवाड (Jaysingrao Gaikwad) यांनी व्यक्त केला आहे. भाजपला पराभूत करण्यासाठीच मी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेत आहे. भाजप हा पक्ष सध्या हवेत गेला आहे. ते सध्या विमानापेक्षाही जास्त उंचीवर आहेत. मात्र, आता मी भाजपला धडा शिकवणार आहे, त्यासाठी भाजपने तयार राहावे, असा इशारा जयसिंगराव गायकवाड यांनी दिला.

मराठवाडा पदवीधर संघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या जयसिंगराव गायकवाड यांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवून भाजपला सोडचिठ्ठी दिली. यानंतर ते मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील स्वतंत्रपणे दाखल केलेला आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निवडणूक कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपवर आगपाखड केली.

बऱ्याच वर्षांपासून पक्षनेतृत्त्वाकडून माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मला आमदारकी किंवा खासदारकी नको होती. मला केवळ पक्ष मजबूत करण्यासाठी काम करायचे होते. जवळपास गेल्या 10 वर्षांपासून मी नेतृत्त्वाकडे याबाबत मागणी करत होतो. अनेकवेळा वरिष्ठ नेत्यांना ई-मेलद्वारे पत्रव्यवहार केले, फोन केले. मात्र, तरीही पक्षाने आपल्याला संधी दिली नाही. सातत्याने होणाऱ्या या उपेक्षेला कंटाळूनच आपण पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे जयसिंगराव गायकवाड यांनी स्पष्ट केले. महाविकासआघाडीतील तीन पक्षांच्या ताकदीमुळे ही निवडणूक भाजपला अवघड जाणार आहे. यामध्ये आता जयसिंगराव गायकवाड यांनीच पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने भाजपच्या अडचणींमध्ये भर पडण्याची शक्यता आहे.

जयसिंगराव गायकवाड मराठवाड्यातील मातब्बर नेते
जयसिंगराव हे जनसंघाच्या स्थापनेपासून भाजपच्या सोबत असणाऱ्या नेत्यांपैकी एक होते. मराठवाड्यातील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी केंद्रात दोनवेळा राज्यमंत्रीपद भुषविले होते. तर मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून दोनदा ते विधानपरिषदेवर निवडून गेले होते. दीर्घकाळ भाजपसोबत असल्यामुळे जयसिंगराव गायकवाड यांचे मराठवाड्यातील पक्षाच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान आहे. (Ex union minister and MP Jaysingrao Gaikwad resign from BJP)

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment