औरंगाबाद – टीव्ही सेंटर परिसरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याच्या खुनाचा उलगडा झाला असून हा खून त्याच्या जवळच्या मित्रानेच केल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखा आणि बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या पथकाला 24 तासांत खुनाचा छडा लावण्यात यश मिळाले असून सहा हजार रुपयांवरून दोघांत वाद झाल्यानंतर आनंद दिलीपराव टेकाळे (21, रा. एन-6, सिडको) याने खून केल्याचे समोर आले आहे. आनंदने 15 डिसेंबरच्या रात्री साडेदहा ते साडेअकरा दरम्यान मित्र कृष्णा शेषराव जाधव (22, जिजाऊ चौक, टीव्ही सेंटर) याचा हिमायतबागेतील निर्मनुष्य ठिकाणी खून केला होता. संशयित आरोपी मित्र आनंदला पोलिसांनी काल सकाळच्या सुमारास जिकठाण फाट्यावर सापळा रचून पकडले.
यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, संशयित आनंद याच्याकडून मृत कृष्णाने साधारण 15 ते 20 दिवसांपूर्वी सहा हजार रुपये घेतले होते. आज, उद्या करत कृष्णा पैसे देत नव्हता. दरम्यान बुधवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास कृष्णा मित्राच्या वाढदिवसाला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला खरा, मात्र तसा कोणाचा वाढदिवसच नसल्याचेही तपासात समोर आले आहे. घराबाहेर पडताना लवकर येतो म्हणत कृष्णा गेला होता. दरम्यान, हिमायतबागेजवळील उद्धवराव पाटील चौकात त्याला दोन मित्र भेटले. त्यांच्याशी गप्पा मारून तो हिमायतबाग परिसरात गेला. तेथेच त्याने मित्र आनंदला बोलावून घेतले. गप्पा मारीत सुरुवातीला ते दारू पिले. परंतु, काही वेळाने आनंदने पोट दुखत असल्याचे सांगून दारू पिण्यास नकार दिला. त्यावरून त्यांच्यात कुरबुर झाली. तेव्हा तुला दारू प्यायला पैसे मिळतात; पण माझे सहा हजार रुपये द्यायला मिळत नाहीत, असे आनंद कृष्णाला म्हणाला. त्यावरून वाद वाढत गेला.
तोच कृष्णाने चाकू काढून आनंदवर वार केला. पण, सावध आनंदने त्याचा वार चुकविला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यावर आनंदने त्याच्याकडील चाकू हिसकावून घेत त्याच्यावर बेछूट वार केले. कृष्णाच्या शरीरावर तब्बल 48 ते 50 ठिकाणी गंभीर जखमा आहेत. कृष्णाचा खून करून आनंदने रातोरात संगमनेर तालुक्यातील लोणी (जि.नगर) गाठले. रात्रभर तिथे थांबल्यानंतर सकाळी बुलेट घेऊन नेवासा मार्गे औरंगाबादकडे निघाला. दरम्यान, त्याने काहीवेळ मोबाइल सुरू केला. त्याचे लोकेशन मिळताच गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल म्हस्के, सहायक फौजदार सतीश जाधव, सुधाकर मिसाळ, जितेंद्र ठाकूर, रवींद्र खरात, सुनील बेलकर, विजय पिंपळे यांच्या पथकाने जिकठाण फाटा, खोली क्र. 20 जवळ बुलेटच्या क्रमांकावरून आनंद टेकळेला पकडले. त्याची चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. त्यानंतर त्याला बेगमपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले.