औरंगाबाद – जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. असे असताना नागरिकांकडून कोरोना नियमांचे पालन होत नाही. शिवाय अनेक ठिकाणी गर्दी दिसून येत आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाभरात प्रत्येक तालुक्यात 1 या प्रमाणे नऊ भरारी पथकांची नियुक्ती करुण गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. या पथकांद्वारे गर्दीच्या ठिकाणचे चित्रीकरण करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व प्रादेशिक प्रमुखांची आढावा बैठक शनिवारी रात्री घेण्यात आली. यावेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, डॉ. भारत कदम, प्रभोदय मुळे, संगीता सानप, संगीता चव्हाण, उपविभागीय अधिकारी रोडगे, स्वप्नील मोरे, विधाते तसेच सर्व तालुक्यांचे तहसीलदार आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात पथकांच्या माध्यमातून मंगल कार्यालय, हॉटेल्स, भाजी मंडई आदी ठिकाणांवर लक्ष ठेवल्या जाणार आहे. शिवाय भरारी पथकांच्या माध्यमातून गर्दीचे चित्रीकरण देखील करण्यात येणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे बंधनकारक असून, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.