कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
मलकापूर नगरपरिषद प्रधानमंत्री आवास योजना मंजूर घरकुलांना राज्य व केंद्राचा 2 कोटी 18 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर हा निधी मिळाल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मलकापूर नगरपरिषदेने घटक क्र.4 अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना वैयक्तिक घरकुलाचा लाभ देणे या घटकाखाली पाठविलेल्या एकूण 5 प्रस्तावाअंतर्गत 319 घरकुलांना केंद्रीय सनियंत्रण व मंजुर समितीने मान्यता दिलेली आहे. यापैकी बहुतांश घरकुलांची कामे सुरु असून, 2. 50 लाख अंदाजपत्रकीय अनुदान मंजुर आहे. यापैकी केंद्र शासनाकडून 1.50 लाख व राज्य शासनाकडून 1 लाख निधीची तरतुद करण्यात आली आहे.
त्यापैकी राज्य शासनाकडून 203 घरकुलांसाठी राज्य शासनाच्या हिस्स्याची प्रती घरकुल 1 लाख प्रमाणे 2 कोटी 3 लाखाचा निधी मलकापूर नगरपरिषदेस प्राप्त झाला आहे. उर्वरित 116 घरकुलांना 1 कोटी 16 लाखाचे अनुदान अद्याप प्राप्त झालेला नव्हता.
तसेच केंद्र शासनाकडून 319 मंजुर घरकुलापैकी 112 घरकुलांसाठी पहिला हप्त्याची 55 लाख 20 हजाराचा निधी प्राप्त झाला होता. उर्वरित 4 कोटी 23 लाख 30 हजाराचा निधी प्राप्त झाला नसल्याने लाभार्थींना घरकुलांची कामे अपुर्ण आहेत. त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे नगरपरिषदेविषयी नागरिकांच्यामध्ये गैरसमज निर्माण होत होते. याअनुषंगाने ना. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी म्हाडा मुंबई येथे मलकापूर नगरपरिषदेचे कार्यक्षेत्रामधील घरकुलांना केंद्र व राज्य शासनाचा निधी मिळण्याकामी बैठक बोलवली होती.
निधी मिळण्यासाठी मलकापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.निलम येडगे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन सभापती सौ.पुजा चव्हाण, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. गितांजली पाटील, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, निलेश पाटील, ज्ञानदेव साळुंखे व यांनी मालाचे सहकार्य केल्याचेही उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी सांगितले.