गडचिरोली प्रतिनिधी । पीपल्स गुर्रिल्ला आर्मीच्या आजपासून सुरु झालेल्या स्थापना सप्ताहाला हिंसक वळण देत नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथील दोन नागरिकांची हत्या केली आहे. मासू पुंगाटी व ऋषी मेश्राम अशी मृतांची नावे आहेत.तर अल्लापल्ली-भामरागड आणि कमलापूर-दामरंचा या दोन्ही मार्गावर झाड तोडून रस्ता अडविला आहे. एकूणच गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे.
अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील वनविभागाच्या हत्ती कॅम्प मध्ये काल मध्यरात्री नक्षल्यांनी प्रवेश करून येथे सुरू असलेल्या सौंदर्यीकरण कामाचे साहित्य पूर्ण नासधूस केले आणि पर्यटकांसाठी उभारण्यात आलेले शेड,शौचालय आणि प्रवेशद्वारावर असलेल्या हत्तींचे स्टॅच्युचे तोडफोड करून या कामाला विरोध दर्शविला. एवढेच नव्हे तर केंद्र आणि राज्य सरकारच्या वन कायद्यात संशोधन करीत पाचवी अनुसूचित असलेल्या आदिवासींच्या हक्कांमध्ये परिवर्तन करण्यात येत आहे व ग्रामसभांचे परवानगी न घेता बळजबरीने जनतेला बेदखल करण्यात येत असल्याचे उल्लेख करून कमलापूर येथील कोलामर्का अभयारण्य आणि हत्ती कॅम्प पर्यटन क्षेत्राला विरोध करण्याचे आवाहन केले आहे.
२ डिसेंबरपासून नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताह सुरू झाला असून हा सप्ताह पाळण्यासाठी नक्षलवाद्यांनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून विविध ठिकाणी पत्रके बॅनर बांधून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मागील खूप दिवसापासून या परिसरात शांततेचे वातावरण होते. मात्र, नक्षल सप्ताहमुळे पुन्हा एकदा नक्षल्यांनी डोकं वर काढल्याचे दिसून येत आहे.