मुंबई : हॅलो महाराष्ट्र – गणपती बाप्पाचे सप्टेंबर महिन्यात आगमन होणार आहे. त्यामुळे सर्व गणेश भक्तांचे बाप्पाच्या उत्सवासाठी काय निर्बंध लावले जातील याकडे लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे आता राज्य सरकारने गणेशोत्सव संदर्भात नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे यंदादेखील गणेशमूर्तींची उंची मर्यादितच असावी असा आदेश काढण्यात आला आहे.
गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे आवश्यक असून सार्वजनिक गणेश मूर्तींची उंची ४ फूट तर घरगुती बाप्पाची मूर्तीची उंची २ फूट असावी असा आदेश काढण्यात आला आहे. यामुळे यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांचा यंदाच्या वर्षीदेखील हिरमोड झाला आहे. याव्यतिरिक्त विसर्जन देखील कृत्रिम तलावात करावे आणि शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी, असेदेखील सांगण्यात आले आहे. कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गणेशोत्सवसाठी मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे
१. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
२. कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.
३. श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपतीकरिता २ फूटांच्या मर्यादेत असावी.
४. या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील पातू/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करावे.
५. उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा.
६. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम शिबीरे राबवून रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य याणाद्वारे कोरोना, मलेरिया, डेग्यू इ. आजार आणि उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
७. लागू करण्यात आलेले इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.
८. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदीचे काटेकोरपणे पालन केले जावे.
९. श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
१०. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच धर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शरिरीक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
११. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरीष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे.
१२. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमूर्तीच्या विसर्जनाकरिता कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी.
१३. कोविड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक असणार आहे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे लागणार आहे.