सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
वीर धरण परिसरामध्ये प्रेमी युगुलांचा सुट्टीमध्ये पर्यटनासाठी नीरा नदीच्या किनारी फिरायला आलेल्या नागरिकांना कुकरी व चाकू सारख्या घातक शस्त्रांचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील सहा जणांना शिरवळ पोलिसांनी थरारक पाठलाग करत जेरबंद केले आहे. लुटमारीच्या पार्श्वभूमीवर वीर धरण परिसरात शिरवळ पोलिसांकडून गस्त घालत असताना संशयितरित्या दुचाकीवर वावरणाऱ्या युवकांना पोलिसांनी हटकले असता संबंधात त्यांनी पळ काढला.त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
यावेळी सर्व पोलिसांनी पाठलाग करीत सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले असता. संशयित युवक हे दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न आहे. खंडाळा तालुक्यातील शिरवळ जवळील वीर धरण परिसर हे अलीकडच्या काळामध्ये नैसर्गिक दृष्ट्या पर्यटन केंद्र म्हणून उदयास आलेले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये त्या ठिकाणी पर्यटक म्हणून आलेल्या प्रेमीयुगुलांना व नागरिकांना लुटण्याच्या घटना घडलेल्या आहेत. शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस अंमलदार रवींद्र कदम, जितेंद्र शिंदे, धीरज यादव, अमोल जगदाळे, स्वप्नील दौंड यांचे पथक या परिसरात गस्त घालत असताना. परिसरामध्ये तोंडाला मास्क लावलेल्या अवस्थेत दुचाकीवर संशयित रित्या युवक फिरताना आढळून आले.
शिरवळ पोलिसांनी त्यांचा पाठलाग करीत नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरील महावीर सुखदेव खोमणे (वय 23,रा. चंद्रपुरी ता. माळशिरस, जि. सोलापूर) शाहरुख बक्षी (वय- 24, मुळगाव मार्डी, ता. माण, सध्या- चंद्रपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर), भैय्या हुसेन शेख (वय- 25, रा. कांबळेश्वर, ता. बारामती, जि पुणे) व एका 17 वर्षीय अल्पवयीन युवक असे चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचे अंग झडती घेतली असता त्यांच्याकडे 13 इंच लांबीची कुकरी, साडे सात इंच उंचीचा नक्षीदार चाकू अशी घातक शस्त्रे आढळून आली. तर अन्य दोघांनी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले असता. लोणंदजवळ फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी लोणंद येथे मोठ्या शिताफीने आमीर मौलाली मुल्ला (वय- 21, रा. चंद्रपुरी ता. माळशिरस, जि. सोलापूर) व मयूर अंकुश कारंडे (वय- २०,रा. तावशी, ता. इंदापूर, जि. पुणे यांना ताब्यात घेत शिरवळ पोलिसांच्या स्वाधीन केले.
यावेळी महावीर खोमणे यांच्या ताब्यातून कुकरी मोबाईल नंबर प्लेट नसलेली दुचाकी असा ८० हजार रुपयाचा, तर शाहरुख पक्षी यांच्या ताब्यातून नक्षीदार व दोन्ही बाजूने धारदार असलेला चाकू मोबाईल हँडसेट व नंबर प्लेट उलटी लावलेली दुचाकी क्रमांक (एम एच ४२- ०८४२) असा एकूण साधारणपणे १ लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील दरोडा व दरोड्याच्या प्रयत्नाचे गुन्हे उघडकीस आले असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. वीर धरण परिसरामध्ये मित्रांसमवेत फिरायला गेलेल्या भोर येथील युवकांना शस्त्राचा धाक दाखवत दरोडा टाकत, रोख रक्कम १० हजार व मोबाईल हँडसेट असा ऐवज येणाऱ्या या टोळीचा गुन्हा उघडकीसआणण्यात पोलिसांना यश आले आहेत. संबंधित दरोड्यातील 3500 रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे करत आहेत.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा