वसमत | गांधीवादी विचारवंत व स्वातंत्र्य सैनानी गंगाप्रसाद अग्रवाल याचं आज वसमत जि. परभणी येथे वृध्दापकाळाने निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते.
हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत या गावी १९२३ मध्ये जन्मलेल्या गंगाप्रसाद अग्रवाल यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी विद्यालयातून मॅट्रिक आणि वर्धा येथील बियाणी महाविद्यालयातून कॉमर्सची पदवी घेतली. तेव्हाच त्यांचे नाते गांधी-विनोबा आणि स्वातंत्र्यसंग्राम व भूदान आंदोलन यांच्याशी जोडले जाणार हे निश्चित झाले. महाविद्यालयात शिकत असताना ‘चले जाव’ चळवळीत आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर हैदराबाद मुक्तिसंग्रामात त्यांनी मोलाचा सहभाग दिला. मराठवाडय़ातील गोविंदभाई श्रॉफ, अनंतराव भालेराव इत्यादी दिग्गजांच्या बरोबर अनेक सामाजिक आघाडय़ांवर त्यांनी बिनीचे शिलेदार म्हणून भूमिका निभावल्या.
स्वातंत्र्योत्तर भारतात गांधींच्या कल्पनेतील स्वराज्य आणण्यासाठी झेंडा सत्याग्रह, जंगलतोड सत्याग्रह, १९६२ व ६५च्या युद्धाच्या वेळी शांतिसेनेचे कार्य, जयप्रकाश नारायण यांच्याबरोबर आंदोलन, आणीबाणीच्या काळात तुरुंगवास, विनोबांच्या भूदान आंदोलनातील आघाडी सांभाळणे, त्यानंतर दुष्काळाविरुद्ध झुंज अभियान, मराठवाडय़ाच्या पाणीप्रश्नासाठी संघर्ष, भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन, बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यावर हिंदू-मुस्लीम ऐक्य व शांतता प्रस्थापना कार्य, जंगल-जल-जमीन यांचे ग्रामसभेला अधिकार मिळावेत यासाठीची लढाई अशी खूप मोठी यादी त्यांच्या ७० वर्षांतील सामाजिक कार्याबाबत सांगता येईल. १९५३ मध्ये वसमत नगर परिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले, तसेच २००० मध्ये वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
गांधी विचारांशी ते कायम एकनिष्ठ राहीले. त्यांच्या निधनाने, गांधीवादी विचार व संस्था यांचं खुप मोठ नुकसान झाले आहे.