हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडर च्या किमतीत वाढ होत असताना नवीन गॅस कनेक्शनच्या दरातही वाढ झाली आहे. यापूर्वी गॅस सिलिंडरचे कनेक्शन घेण्यासाठी 1450 रुपये मोजावे लागत होते. पण आता यामध्ये 750 रुपयांची वाढ झाली असून आता तुम्हांला यासाठी 2200 रुपये मोजावे लागतील. यामुळे सर्वसामान्य जनतेला पुन्हा एकदा मोठा फटका बसला आहे.
पेट्रोलियम कंपन्यांच्या वतीने 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरच्या कनेक्शनमध्ये प्रति सिलेंडर 750 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. जर तुम्ही दोन सिलिंडर कनेक्शन घेतले तर तुम्हाला 1500 रुपये अधिक द्यावे लागतील. हे नवीन नियम येत्या16 जूनपासून लागू होणार आहे.
रेग्युलेटरसाठी द्यावे लागणार 250 रुपये
रेग्युलेटरच्या किमतीतही वाढ झाली असून यापूर्वी 150 रुपयांना मिळणारा रेग्युलेटर आता 250 रुपयांना मिळेल. पाइप साठी 150 रुपये तर पासबुक साठी 25 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.
उज्वला ग्राहकांनाही दणका-
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे ग्राहकही नवीन दरांमुळे हैराण झाले आहेत. या ग्राहकांनी त्यांच्या कनेक्शनवर 2 सिलिंडर घेतल्यास दुसऱ्या सिलिंडरसाठी वाढीव सुरक्षा रक्कम भरावी लागेल. मात्र, उज्ज्वला योजनेंतर्गत एखाद्याने नवीन कनेक्शन घेतल्यास सिलिंडरच्या सुरक्षेची रक्कम पूर्वीप्रमाणेच भरावी लागणार आहे.