औरंगाबाद | कोरोना महामारीच्या काळात स्मशानभूमीमध्ये पार्थिव जाळण्यासाठी रांगाच रांगा लागेल्या दिसत असे यामुळेच शहरात कैलासनगर स्मशानभूमीत गँस शवदाहिनी बसवण्यात आली आहे. या शवदाहिनीची चाचणी करून यातील सर्व त्रुटी आणि दोष सुधारून या स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीचे लोकार्पण मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांच्या हस्ते करण्यात आले.
‘नागरिक आणि महापालिका एकत्र आले आणि त्यांनी काम केले तर शहरात विकासाबद्दल चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. शहराच्या विकासाबद्दल नागरिकांनी पुढाकार घेतला तर कोणतेही शहर मागे राहणार नाही. त्याचबरोबर विकासकामांसाठी सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत ही समाधानाची बाब असून गॅस शवदाहिनीद्वारे पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने महापालिकेने महत्वाचे पाऊल उचलले आहे. अंत्यसंस्कारासाठी यापुढे लाकडांचा वापर केला जाऊ नये, यासाठी महापालिका विचार करत आहे. त्यासाठी शहरातील सर्वच स्मशानभूमींमध्ये टप्प्याटप्प्याने गॅस शवदाहिनी उभारली जाईल.’ असे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले.
ही गॅस शवदाहिनी ‘औरंगाबाद फर्स्ट’ आणि ‘लायन्स क्लब’ यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आली आहे. या कार्यक्रमाला पालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त अपर्णा थेटे, विद्युत विभागाचे प्रमुख ए. बी. देशमुख, वॉर्ड अधिकारी एस. आर. जरारे, ‘औरंगाबाद फर्स्ट’चे रंजीत कक्कड, रवींद्र कोंडेकर, अनिल माळी, प्रशांत देशपांडे, शेख हबीब, शिवप्रसाद जाजू, हेमंत लांडगे, निखिल भालेराव, ललित जाधव, अविनाश देशमुख, ‘स्मार्ट सिटी’चे आदित्य तिवारी, स्वच्छता निरीक्षक असदुल्ला खान आदी उपस्थित होते.