कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
मोरणा विभागातील पश्चिमेला अतिदुर्गम ठिकाणी वसलेल्या पांढरेपाणी गावातील 60 वर्षीय वृद्धावर गव्याने हल्ला करून काळीज फाडून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या वृध्दाला उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखले केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमीला जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यातून डोलीत बसवून 2 तास पळवत आणून 6 ते 7 तासानंतर दवाखान्यात दाखल केले. देशात स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. मात्र, पांढरेपाणी गावाला काळ्या पाण्याची शिक्षा आजही भोगावी लागत आहे. जखमीला ढोलीतून, अोढ्यातून छातीएवढ्या पाण्यातून जीवघेणा संघर्ष करावा लागला.
पाटण तालुक्यातील मोरणा विभागाच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर अतिदुर्गम व डोंगराळ ठिकाणी पांढरेपाणी हे गाव वसले आहे. या गावातील कानू धाकलू शेळके (वय- 60) यांना सकाळी 10 वाजता मोरधोंडी नावाच्या शिवारात आपली पाळीव जनावरे चरावयास घेवून गेले होते. येथे पावसाचा जोर कायम असल्याने शेळके हे डोक्याला प्लास्टीक कागदाची खोळ बांधून झाडाच्या आडोशाला बसले होते. अचानक झाडीतून आलेल्या गव्याने त्यांच्यावर हल्ला करत जोराची धडक दिली. शेळके यांच्या दोन्ही बाजूच्या बरगड्यात रानगव्याचे शिंग घुसल्याने ते रक्तबंबाळ होवून गंभीर जखमी झाले. याची माहिती मिळताच गावातील लक्ष्मण शेळके यांनी त्यांना उचलून तातडीने घरी आणले.
वनविभागाने रस्त्याला अडथळा आणल्याने व गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्याने गावात वाहन जावू शकत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी व नातेवाइकांनी जखमी शेळके यांना डोलीत घालून पांढरेपाणी ते पाचगणी अशी 2 तासांची खडतर पायपीट करत मोरगिरीपर्यंत आणले व तेथून 108 रग्णवाहिकेतून कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मोरणा विभागात आतापर्यंत गव्याने अनेक जणांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यात काहींना प्राणासही मुकावे लागले आहे तर अनेक जणांना अपंगत्व आले आहे.
वनविभागाच्या अडमुठेपणामुळे लोकांचे जीव जाण्याची वेळ
विद्यमान आ. शंभूराज देसाई आणि वनविभागाचे अधिकारी यांच्यात वारंवारं बैठका झालेल्या आहेत. मात्र, कोणताही तोडगा निघाला नाही. वनविभाग आडमुठेपणाची भूमिका घेत आहे. लोकांच्या जीवापेक्षा वनविभाग जाचक अटी सांगत आहेत. तेव्हा आता लोकांच्या जीव गेल्यास वनविभाग जबाबदार असल्याचे स्थानिक नागरिक लक्ष्मण शेळके यांनी सांगितले.