हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस साठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गुलाम नबी आझाद हे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अखेर आज त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधी यांना राजीनाम्याचे पत्र पाठवलं आहे. अत्यंत खेदाने आणि अत्यंत भावूक अंत:करणाने मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतचे माझं 50 वर्षांचं नातं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. असं त्यांनी आपल्या पत्रात म्हंटल. तसंच भारत जोडो यात्रेऐवजी काँग्रेस जोडो यात्रा काढावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
Congress leader Ghulam Nabi Azad severs all ties with Congress Party pic.twitter.com/RuVvRqGSj5
— ANI (@ANI) August 26, 2022
गुलाम नबी आझाद यांनी आपल्या पत्रात राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील सर्व ज्येष्ठ अनुभवी नेते काँग्रेसमध्ये पूर्णपणे बाजूला झाले आहेत. अननुभवी नेते पक्षाचा कारभार पाहू लागले. त्यानंतर सातत्याने काँग्रेसला निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. 2014 पासून दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आहे.
गुलाम नबी म्हणाले की 2014 ते 2022 दरम्यान 49 विधानसभा निवडणुका झाल्या, त्यापैकी 39 मध्ये काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसला चार राज्यांत विजय मिळाला, तर सहा राज्यांत मित्रपक्षाचे सरकार स्थापन झाले. सद्यस्थितीत काँग्रेस केवळ दोन राज्यात सत्तेत असून दोन राज्यात मित्रपक्ष म्हणून सहभागी आहे. पक्षाच्या 23 वरिष्ठ सहकाऱ्यांनी काँग्रेसच्या स्थितीबाबत सर्वोच्च नेतृत्वाला सूचना दिल्या होत्या, मात्र त्या मान्य करण्यात आल्या नाहीत. असेही ते म्हणाले .
काँग्रेसमधील कमजोरीबाबत बोलणाऱ्या 23 नेत्यांचा अपमान करण्यात आला. काँग्रेस अशा स्थितीत पोहोचली आहे जिथून परत येणे शक्य नाही. मी जड अंत:करणाने काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याचे आझाद यांनी पत्रात लिहिले आहे. काँग्रेससोबतचे माझे अनेक दशके जुने नाते तोडण्याचा निर्णय घेतल्याचे अत्यंत खेदाने वाटते. भारत जोडो यात्रा’ सुरू करण्यापूर्वी पक्षनेतृत्वाने देशभर ‘काँग्रेस जोडो यात्रा’ करायला हवी होती असा टोलाही आझाद यांनी लगावला.
खरं तर गुलाम नबी आझाद यांची पक्षातील अत्यंत ज्येष्ठ नेत्यांमध्ये समावेश होता. तसेच ते गांधी घराण्याच्या अत्यंत जवळच्या नेत्यांपैकी एक मानले जात होते. पण 2019 नंतर पक्षांतर्गत बदलाचा आवाज उठू लागला आणि त्यानंतर G-23 गट निर्माण आला. G-23 नेत्यांमध्ये काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा समावेश होता . यामध्ये गुलाम नबी आझाद हे सुद्धा आघाडीवर होते. तेव्हापासून त्यांचे गांधी घराण्यासोबतचे अंतर वाढत गेले.