हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय निवडणूक समिती मध्ये वर्णी लागल्यानंतर त्यांना पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी द्यावी अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केली आहे. त्यावरून पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांना विचारलं असता त्यांनी फडणवीस उभे राहिले तर मला आनंदच होईल अस म्हंटल आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना गिरीश बापट म्हणाले, राजकीय पक्षाची उमदेवारी कोणाला द्यायची याचा निर्णय प्रमुख नेते घेतात. त्यासाठी एक यंत्रणा असते, अध्यक्ष असतात, निवडणूक मंडळ असते. मात्र, संघटनाच उमेदवार ठरवू लागल्या तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. संघटनांनी योग्य अयोग्य बघून त्यांचा प्रचार करावा पण फडणवीसांना पुण्यातून उमेदवारी मिळाल्यास मला काही प्रॉब्लेम नाही, उलट मला आनंदच आहे.
ब्राह्मण महासंघाची नेमकी मागणी काय-
देवेंद्र फडणवीसांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केली होती. याबाबत त्यांनी भाजपचे राष्टीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहिलं आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे अत्यंत कार्यक्षम व्यक्तिमत्व आहेत, हे त्यांच्या गेल्या पाच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सिद्ध झाले आहे. फडणवीस हे भाजपचे भविष्य असून नरेंद्र मोदी यांच्यानंतर भारतीय जनता पक्षाला सक्षम नेतृत्व देऊ शकतील अशा दोन्ही तीन नावांमध्ये देवेंद्रजींचे नाव ठळकपणे घ्यावे लागेल. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने 2006 ला काँग्रेसचे सुरेश कलमाडी, 2014 ला भाजपचे अनिल शिरोळे आणि २०१९ ला भाजपचे गिरीश बापट यांच्यासोबत राहिला आणि निकाल तुमच्या समोर आहे. मी या पत्राद्वारे तुम्हाला विनंती करू इच्छितो की देवेंद्रजींसारख्या राष्ट्रीय नेतृत्वासाठी पुणे हे अत्यंत सुरक्षित ठिकाण आहे. पुणे लोकसभा जागेसाठी आपण देवेंद्रजींचे नाव जाहीर करून त्यांचा योग्य सन्मान कराल असा विश्वास अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने व्यक्त केला.