लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये लातूरच्या चाकूर परिसरात एका 40 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. या व्यक्तीवर अज्ञात हल्लेखोरांनी डोळ्यात मिरची पूड टाकून लोखंडी रॉडने घाव घातले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात या प्रकरणाचा छडा लावला. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. या आरोपींनी अनैतिक संबंधातून ही हत्या केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
मृत व्यक्तीचे व्यक्तीचे नाव हणमंत व्यंकटी येरवे असे आहे. मृत हणमंत यांचे लातूर रोड परिसरातील रहिवासी असणाऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. संबंधित महिला गेल्या दहा वर्षांपासून आपल्या पतीपासून विभक्त राहत आहे. पतीपासून वेगळं झाल्यानंतर, तिचं हणमंत येरवे याच्याशी सूत जुळलं होतं. पण कालांतराने हणमंतने दारू पिऊन संबंधित महिलेला त्रास द्यायला सुरुवात केली. यादरम्यान त्याने अनेकवेळा आपल्या प्रेयसीला मारहाण देखील केली आहे. यानंतर आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून संबंधित महिलेचे आरोपी संतोष धोंडीराम घाडगे याच्याशी सूत जुळले. संतोष आणि आरोपी महिलेचे अनैतिक संबंध वाढत गेले आणि दुसरीकडे मृत हणमंत या महिलेला आणखी त्रास देऊ लागला.
यामुळे मृत हणमंतच्या त्रासाला कंटाळून संबंधित हिलेनं आपल्या नवीन प्रियकराच्या मदतीने जुन्या प्रियकराची हत्या करण्याचा कट रचला. यानुसार महिलेनं रविवारी सायंकाळी हणमंतला दुचाकीवरून चाकूर याठिकाणी नेले. त्याठिकाणी आरोपी महिलेनं एकाला फोन केला आणि हणमंतला मोहदळ भागातील एका आडवळणावर घेऊन गेली. त्यानंतर याठिकाणी आधीपासून दबा धरून बसलेल्या संतोष आणि त्याच्या एका साथीदाराने हणमंतच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लोखंडी रॉडने सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की हणमंत जागीच मृत्यूमुखी पडला. आरोपींनी हणमंतचा मृतदेह तिथेच लपवून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास करून आरोपी महिलेसह तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.