रमजान महिन्यात इफ्तारसाठी विशेष सूट द्या

मुस्लिम बांधवांची आरोग्य मंत्र्याशी चर्चा

औरंगाबाद : राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुश्ताक अहमद यांच्या नेतृत्वात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश भैया टोपे यांची जालन्यात नुकतीच भेट घेऊन येत्या काही दिवसांत सुरू होणा-या इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्यासंदर्भातील समस्या व तरावीहची नमाज बाबतीत चर्चा करण्यात आली. रमजान महिन्याचे इस्लाम धर्मामध्ये महत्व आहे. हा महिना वर्षातून एकदाच येत असतो. त्यामुळे या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव रोजा, पाच वेळ नमाज व्यतिरिक्त तरावीहची विशेष नमाज पठण करतात. शिवाय महाराष्ट्रात सध्या कोरोनामुळे लाॅकडाऊन आहे. कडक लॉकडाऊन पण लागण्याची शक्यता आहे.

त्यामुळे ऐन रमजान महिन्यात लाॅकडाऊन लावल्यावर काही समस्या उद्भवू शकतात. तसेच रमजान महिन्यात इफ्तारसाठी फळे खरेदीसाठी मुस्लिम बांधव बाजारात जातात. तसेच विशेष नमाज पठण करण्यासाठी मशिदीमध्ये जातात. लाॅकडाऊन असल्याने ह्या सर्व बाबतीत समस्या निर्माण होणार असल्याने यासंदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी विस्तारपूर्वक चर्चा करण्यात आली असता विशेष नमाज अदा करण्यासाठी रात्री 8 ते 10 या दोन तासांसाठी लाॅकडाऊन मध्ये शिथिलता देण्याचे मंत्री महोदयांनी आश्वासन दिले.

या संदर्भात चर्चा करतांना राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मुश्ताक अहमद, माजी शहर कार्याध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, बादशहा पटेल, मा. शहर उपाध्यक्ष मोहम्मदह हबीब मुन्नाभाई, शहर सचिव तय्यब खान, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक सेल जलील अहमद खान, समीर मिर्जा, मोहम्मद रजी, विनोद खांबगावकर, महिला शहर उपाध्यक्षा मंजुषा पवार, गजल जमादार, अनीसा बाजी इत्यादींची उपस्थिती होती.

You might also like