हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. राज्य शासनाने लॉकडाऊन करण्याच्या आधी दोन ते तीन दिवस नागरिकांना पूर्वसूचना द्यायला हवी, अशी मागणी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
याबाबत भुजबळ म्हणाले, नागरिकांचे हाल होऊ नयेत तसेच गोंधळ उडू नये यासाठी आधी माहिती द्यायला हवी. अद्याप लॉकडाऊन करण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या सर्व विषयांवर चर्चा होईल असं सांगत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लॉकडाऊन पूर्वीची सर्व खबरदारी घेण्यात येईल, असेहि भुजबळ यांनी संकेत दिले.
विरोधक लॉकडाउनवरून टीका व आंदोलन करण्याच्या प्रतिक्रियेवर भुजबळ यांनी लॉकडाउन हा विषय राजकारण करण्याचा तसेच मैदान गाजवण्याचाही विषय नाही, असा टोला विरोधकांना लगावला. करोनाबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन चर्चा करण्यात येत असून, शिवाय याबाबत कोणाला काही उपाययोजना सूचवायच्या असतील तर त्या सुचवाव्यात, असे आवाहन यावेळी भुजबळ यांनी केले.