पणजी | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना आजार बळावल्यानंतर मुख्यमंत्रीपद सोडायचे होते मात्र, दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांना नकार दिला, असा दावा गोव्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी केला आहे. सरदेसाई हे गोव्यातील भाजप सरकारमधील सहभागी मित्र पक्ष गोवा फारवर्ड पार्टीचे प्रमुख आहेत. या आठवड्यात काँग्रेसने इतर काही पक्षांसोबत आणि सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पर्रीकर यांना राजीनामा द्यावा यासाठी एक मोर्चा काढला होता. मनोहर पर्रीकर हे कॅन्सरग्रस्त आहेत. 14 ऑक्टोबर रोजी त्यांनी दिल्लीतील एम्समधून त्यांनी डिस्चार्ज दिला गेला आहे. तेव्हापासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.
विजय सरदेसाई यांनी सांगितले की, मनोहर पर्रीकर यांना मुख्यमंत्रीपद सोडायचे होते. गणेशोत्सवाच्या काळात आजार बळावल्यानंतर त्यांनी एखाद्या मंत्र्यांकडे कारभार सोपवावा अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी त्यास नकार दिला. त्यावेळी त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुख्यमंत्री पर्रीकर आजारी असल्याने प्रशासकीय निर्णय व कामाकाजावर परिणाम झालेला आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले. विजय सरदेसाई यांच्या आधी महसूलमंत्री रोहन खौते यांनीही पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत सरकारचे कामकाज चालवणे अवघड झाल्याचे म्हटले होते.
दरम्यान, गोव्यातील खासदार नरेंद्र सवाईकर यांनी पर्रीकरांचा राजीनामा मागणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी टि्वट करून यावर भाष्य केले की, ‘पर्रीकर स्टेट्समन आहेत. देशाचे संरक्षण मंत्री बनणारे गोव्यातील ते पहिले व्यक्ती आहेत. त्यांनी अनेक प्रोजेक्ट सुरू केले. लोकांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी त्यांनी अथक मेहनत घेतली आहे. सध्या जीवनाची लढाई लढत आहेत त्यामुळे त्यांचा राजीनामा मागणे योग्य नाही.