संजय राऊत गोव्यात का येतात? इथं त्यांचा एक सरपंचही नाही; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी उडवली खिल्ली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी गोवा विधानसभा निवडणूक सध्या चर्चेत आहे. गोव्यात भाजप आणि काँग्रेस मध्ये लढत असताना शिवसेना, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने निवडणूक लढवत रंगत आणली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतंच गोव्यात काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली होती. तसेच गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली होती. त्यावरून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. पक्षाचा गोव्यात साधा सरपंचही नाही मग ते इथं का येतात असे ते म्हणाले.

एका वृत्तवाहिनी शी संवाद साधताना प्रमोद सावंत म्हणाले की , गोव्यात 2022 मध्येही भाजपचे सरकार येईल. संजय राऊत गोव्यात का येतात हे मला माहित नाही ! त्यांच्या पक्षाचा गोव्यात साधा सरपंचही नाही.त्यामुळे ते कुणाला येऊन भेटतात आणि काय करतात हे त्यांचे त्यांना विचारायला हवे, असा सवाल प्रमोद सावंत यांनी केला.

गोव्यातील जनतेचा भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. गोव्यात भाजपचे डबल इंजिन सरकार आहे. गोवा मुक्तीनंतरच्या 60 वर्षांच्या इतिहास जितका विकास झाला नाही तितका डबल इंजिन सरकारने केला आहे. तो लोकांपुढे घेऊन जाणार आहोत. आम्ही केलेली कामे लोकांपुढे घेऊन जाणार आहोत, असं प्रमोद सावंत म्हणाले.