औरंगाबाद: लग्न समारंभासाठी मुंबईहून आलेल्या चालकाशी झटापट करुन दोघांनी त्याच्या गळ्यातील एक तोळा तीन ग्रॅमची सोनसाखळी हिसकावल्याचा खळबळजनक प्रकार शहरातील मुकुंदवाडी भाजी मंडईत घडला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी तपासचक्रे फिरवत अट्टल गुन्हेगार दीपक रमेश साबळे (वय २७, रा. ब्रिजवाडी, बौध्द विहाराजवळ) आणि उमेश गौतम गवळे (वय ३०, रा. गुलमोहर कॉलनी, एन-६, सिडको) या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबईतील चालक संतोष आनंद जाधव (वय ३०, रा. घाटकोपर वेस्ट, आंबेडकरनगर, सागर चाळ) हे लग्न समारंभासाठी मुकुंदवाडी भागात आले होते. व-हाडी मंडळींना लग्न समारंभासाठी सोडल्यानंतर ते मुकुंदवाडीतील भाजी मंडईत फेरफटका मारण्यासाठी गेले. त्याचवेळी दीपक साबळे आणि उमेश गवळे यांनी संतोष जाधव यांना बाजूला ये असे म्हटले. मात्र, जाधव यांनी दोघांना नकार दिल्यावर त्यांनी झटापट केली.
या झटापटीदरम्यान दोघांनी जाधव यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. या घटनेची माहिती जाधव यांनी तात्काळ नजीक असलेल्या मुकुंदवाडी पोलिसांना दिली. त्यामुळे मुकुंदवाडीतील विशेष पथकाने दीपक आणि उमेशचा शोध घेऊन त्यांना पकडले. या दोघांकडून पोलिसांनी सोनसाखळी जप्त केली आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक कृष्णा घायाळ हे करत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group