मुंबई । अक्षय्य तृतीयेला वधारलेल्या सोन्यामध्ये नफेखोरी झाल्याने सलग दुसऱ्या दिवशी कमाॅडिटी बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली असून सोनं ४६ हजारांखाली आले आहे. सोन्याचा भाव ४०१ रुपयांनी कमी झाला. मल्टी कमाॅडिटी एक्सचेंजमध्ये (MCX)सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅमला ४५७९० रुपयांपर्यंत खाली आला आहे.चांदीच्या दरात सुद्धा घसरण झाली आहे.
देशात करोनाबाधितांची आणि मृत्युंची संख्या वाढत आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात ३ मे पर्यंत लाॅकडाऊन आहे. यामुळे सराफा बाजारपेठ पूर्णपणे बंद आहे. कमाॅडिटी बाजारात सोने दरात तेजी दिसून आली होती. सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र मागील दोन सत्रात नफावसुली झाल्याने या मौल्यवान धातूच्या किंमतींमध्ये घसरण झाल्याचे जाणकारांनी सांगितले.
लॉकडाउनमुळे ऐन अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावरील सोनेखरेदीचा मुहूर्त रविवारी सर्वांचाच हुकला. काही सोने व्यापाऱ्यांकडे ऑनलाइन बुकिंगची सोय होती. पण दुकाने बंद असल्याने एकूण खरेदी-विक्री फारच कमी झाली. त्यातून मुंबई व परिसरातून किमान ५०० किलो सोन्याची उलाढाल ठप्प झाली. तर दुसरीकडे चांदीच्या भावात देखील आज ४३० रुपयांची घसरण झाली. चांदीचा भाव किलोला ४१५२७ रुपयांपर्यंत खाली आला आहे. जागतिक बाजारात सोने दरात एक टक्का घसरण झाली. सोन्याचा भाव १७.११ डाॅलरने कमी झाला आणि १६९६.८८ डाॅलर प्रती औंस झाला. चांदीचा भाव प्रती औंस १५.०५ डाॅलर प्रती औंस आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”