सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
मिरजेतील समतानगर येथे राहणारे राहिल दिलावर शेख यांनी सोन्या-चांदीच्या व्यवसायासाठी 2 कोटी 83 लाख 75 हजार रूपये 10 टक्के व्याजाने पैसे घेतले होते. त्यापैकी 5 कोटी 83 लाख रूपये परतफेड करूनही आणखी आणखीन व्याज व मुद्दल असे एकूण 8 कोटीची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रफीक अहमद पटेल, जहुर पटेल,अजमल पटेल, अभिजीत तासिलदार, मन्सूर मुल्ला, दिवाकर पोतदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. राहिल शेख यांचा सोन्या-चांदीचा दागिने बनविण्याचा होलसेल व्यवसाय आहे. व्यवसायासाठी त्यांनी संशयितांकडून 2 कोटी 83 लाख 75 हजार रूपये 10 टक्के व्याजाने पैसे घेतले होते.
त्यातील व्याज आणि मुद्दलासह 5 कोटी 83 लाख रूपये परतफेड केली होती. तरीही आणखीन व्याज व मुद्दल असे एकूण 8 कोटीची मागणी करून 8 कोटीच्या मागणीसाठी शेख कुटूंबियांना सर्वांनी मानसिक त्रास देवून प्लॅटचा जबरदस्तीने ताबा घेतला. त्यानंतर संशयितांनी शेख याना मारहाण केली. वारंवार घडणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर शेख यांनी मिरज गांधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून सहा सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.