गोंदिया प्रतिनिधी | गोंदिया शहराच्या मनोहर चौकात १० नोव्हेंबरला चायनिजच्या दुकानाजवळ उभ्या असलेल्या १७ वर्षीय कान्हा शर्मा या अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली. त्याच्याच दोन मित्रांनी एका वर्षाआधी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून ही हत्या केली. या हत्येने गोंदिया शहरात दिवसेंदिवस बिघडत चालेली कायदा आणि सुव्यवस्थेची अडचण समोर आली आहे. अल्पवयीन तरुणांच्या हातून घडणाऱ्या हत्या, मोठे गुन्हे , यावर पोलिसांनी नियंत्रण आणावं तसेच दोन्ही आरोपींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी गोंदिया शहराच्या दुर्गा चौकातून कॅण्डल मार्च काढण्यात आला. या कँडल मार्चचा समारोप नेहरू चौकात करण्यात आला.
गोंदियातील दही हंडीच्या कार्यक्रमात नाचत असताना दोन्ह आरोपी मुलांचा धक्का कान्हाला लागल्यामुळे सर्व लोकांच्या समोर दोघांनाही कान्हाने या दोघांना कानाखाली लावली. याचाच राग दोघांच्या मनात वर्षभर सलत होता.
१० नोव्हेंबरला रात्री आठ वाजता कान्हा शर्मा हा मनोहर चौकात एकटा उभा असताना दोन आरोपींनी चाकूने त्याच्यावर सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केली. मृत कान्हा शर्मा आणि दोन्ही आरोपी एकाच वर्गात शिकत असून तिन्ही मुले एकाच समाजातील (उच्च शिक्षित) तसेच हाय प्रोफाइल घरातील आहेत. हत्या करण्यासाठी आरोपी मुलाने ऑनलाईन शस्त्र मागवले असल्याची माहिती समोर आली आहे. अशा घटनांना आळा बसावा यासाठी बुधवारी शहरात कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते.