हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज तुम्ही गुगल ओपन केल्यावर तुम्हाला एक वेगळाच फोटो दिसत असेल. हा फोटो पाहून हे काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. गुगल Doodle नेहमीच काहीतरी हटके, अर्थपूर्ण अन मजेदार अॅनिमेशनसह जगभरातील महत्त्वाचे दिवस साजरे करत असते. त्या दिवसासंबंधित फोटो मधून गुगल एक संदेश देऊन युजरला प्रगल्भ बनवत असते. आज जागतिक वसुंधरा दिवस आहे. यानिमित्ताने गुगलने जगातील तापमान वाढीबाबत भाष्य करणारं एक बोलकं चित्र डुडल म्हणून वापरले आहे.
आतापर्यंतच्या सर्वात सर्जनशील डूडलपैकी आज हे डुडल आहे. Google त्याच्या होम पेजवर पृथ्वी दिवस 2022 बद्दल जागरुकता पसरवत आहे. या डुडलद्वारे गुगल मागील काही दशकांमध्ये हवामानात काय बदल झाले अन त्याचे पृथ्वीवर काय परिणाम झाले हे दर्शवत आहे.
या डुडल मध्ये Google Earth द्वारे संकलित केलेल्या छायाचित्रांच्या संकलनाद्वारे वेळ-लॅप्स तयार केला गेला आहे. इमेजरीमध्ये प्रवाळ खडक, हिमनदी आणि सामान्य हिरवळ यासह ग्रहाचे अनेक भाग दाखवले आहेत, जे काही दशकांपासून कमी कमी होताना टाईम लॅप्स मधून स्पष्ट होत आहे.
तुम्ही आज Google डूडलवर क्लिक कराल तेव्हा गुगल तुमचे लक्ष हवामान बदलाकडे वेधेल. जागतिक तापमान वाढीमुळे पृथ्वीवरील हिमाचे प्रमाण कसे कमी होत आहे, भूपृष्टवरील हिरवळीचे प्रमाणही कसे कमी झाले आहे हे या फोटोंमधून दिसून येईल. गुगल याबाबत अनेक पैलू देखील स्पष्ट करेल, जसे की ते कशामुळे होत आहे आणि त्याचे सामान्य लोकांवर होणारे विविध परिणाम.
“काळानुसार उष्ण तापमानामुळे हवामानाचे स्वरूप बदलत आहे आणि निसर्गाचा नेहमीचा समतोल बिघडत आहे. या हवामानातील बदलामुळे मानव आणि पृथ्वीवरील इतर सर्व जीवसृष्टीला अनेक धोके निर्माण होतात.” असे गुगलने हवामान बदलाचे परिणाम सांगताना म्हटले आहे.
तसेच, पृथ्वीवरील हवामान बदलाचे प्रमुख कारण हरितगृह वायू उत्सर्जन आहे. “जशी हरितगृह वायूंचे उत्सर्जन पृथ्वीला झाकून टाकते, ते सूर्याच्या उष्णतेला अडकवतात. यामुळे ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल होतात. आत्तापर्यंत अभ्यास केलेल्या इतिहासातील कोणत्याही टप्प्यापेक्षा सध्या जग जास्त वेगाने तापत आहे.” असे युनाइटेड नॅशन्सने म्हटले आहे.
UN ActNow ने पृथ्वी दिन 2022 च्या निमित्ताने हवामान बदलाविरूद्ध अनेक मार्ग देखील सांगितले आहेत. याकरता लोकांना घरी जास्तीत जास्त ऊर्जा वाचवावी, कामासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा आणि अधिक भाज्या आणि कमी मांस खावं असं सांगण्यात आलं आहे.
जागतिक वसुंधरा दिवस दरवर्षी 22 एप्रिल रोजी आपल्या पृथ्वीला हानी पोहोचवत असलेल्या विविध समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. विशेषत: हवामान बदल आणि ग्लोबल वार्मिंग याबद्दल यादिवशी जागृकता केली जाते.