हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचे महानायक म्हणून भारतात प्रसिद्ध असणारे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचे जगभरात अनेक चाहते आहेत. भारतात तर त्यांचा एक प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे जो अक्षरशः त्यांच्या प्रेमातच आहे. अमिताभ बच्चन हे त्यांच्या अभिनयासोबत भारदस्त आवाजासाठी देखील प्रसिद्ध आहेत. वयाची पंचाहत्तरी ओलांडूनही त्यांनी अनेक आव्हानात्मक भूमिका निभावल्या आहेत. आणि वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी दरवेळी वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका केल्या आहेत. आता ते त्यांच्या भारदस्त आवाजात नेटकऱ्यांना गुगल मॅपवरून पत्ता शोधायला मदत करणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे.
मिड डे ने दिलेल्या एका वृत्तात असा खुलासा करण्यात आला आहे. सध्या गुगल ऑडिओ फॉर्म मध्ये पत्ता सांगणाऱ्या एका ऍपवर काम करत असल्याचे सांगण्यात आले. या ऍप्लिकेशन मध्ये कृत्रिम बुद्धिमतेवर चालणारे सॉफ्टवेअर असणार आहे. या सॉफ्टवेअरच्या ऑडिओ फॉर्मला बिग बी आवाज देण्याची शक्यता आहे. यासाठी गुगलने सध्या अमिताभ बच्चन यांच्याशी संपर्क केला आहे. दोघांमध्ये चर्चा सुरु आहेत. तसेच यासाठी कोट्यवधी रुपये मानधन गुगलने बिग बी ना देऊ केल्याचे सांगितले जात आहे.
सध्या अमिताभ बच्चन हे कोरोनामुळे इतर सेलिब्रिटींसारखे घरीच असले तरी ते सतत त्यांच्या चाहत्यांच्या समोर येत असतात. त्यांनी कोरोनाच्या या संकटकाळात जनजागृतीचे अनेक व्हिडीओ घरातून केले आहेत. जे प्रसारितही झाले आहेत. तसेच घरातूनच कौन बनेगा करोडपतीचे प्रश्नाही ते विचारत आहेत. त्यांच्या इंस्टाग्राम वरून ते सातत्याने त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. त्यांचा आगामी गुलाबो सीताबो हा सिनेमा १२ जूनला ऍमेझॉन प्राईमवर डिजिटली प्रदर्शित केला जाणार आहे. तर एकूण आता बिग बी चा भारदस्त आवाज आपल्याला गुगलच्या ऍपवर देखील ऐकायला मिळणार आहे.