नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटाच्या काळात अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. तर अनेक जणांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. नोकरी गेल्यानंतर अनेक नव्या नोकरीच्या शोधात आहेत. Google ने आपले जॉब सर्च अॅप्लिकेशन भारतात लाँच केले आहे. त्यामुळे नवी नोकरी शोधणे आता अधिक सोपे होणार आहे. या जॉब सर्च अॅपचे नाव कॉर्मो असे आहे. हे अॅप भारतात अनेक तरुणांसाठी एन्ट्री लेवल जॉब शोधण्यासाठी मदत करणार आहे.
गुगलने भारतात कॉर्मो जॉब्स आपल्या पेमेंट अॅप्लिकेशन गुगल पेमध्ये जॉब्स स्पॉटमध्ये जोडले आहे. भारतातील जॉब्स स्पॉट कॉर्मो जॉब्स रुपात दाखल करण्यात येतील. गुगलने हे अॅप बांगलादेश आणि इंडोनेशियामध्ये लाँच केले आहे. यानंतर आता हे अॅप भारतात लाँच करण्यात आले आहे.
जेव्हापासून हे अॅप गुगल पेद्वारे लाँच करण्यात आले आहे तेव्हापासून Zomato, Dunzo सह अनेक कंपन्यांनी यावर 20 लाखहून अधिक नोकऱ्या पोस्ट केल्या आहेत. हे अॅप युजर्सला केवळ एन्ट्री लेवल जॉब्स शोधण्यासाठी मदत करत नाही तर रेज्युम,CV बनवण्यासाठी आणि इतर अनेक नवीन गोष्टी शिकण्यासाठी मदत करते अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.