टीम हॅलो महाराष्ट्र । जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे दहशतवाद्यांसोबत कारमधून जात असताना अटक करण्यात आलेला राष्ट्रपती पदक विजेता पोलीस अधिकारी देविंदर सिंग याच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरहून दिल्लीत आणण्यासाठी १२ लाख रुपये मिळाले होते’, अशी कबुली देवेंद्र सिंगने दिली आहे.
देविंदर सिंगची गुप्तचर विभाग, रॉ आणि पोलीस अशा सर्व यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे. देविंदरने श्रीनगरमध्ये इंदिरा नगर येथील आपल्या राहत्या घरात दहशतवाद्यांना राहण्यासाठी जागा दिली होती. त्याच्या घरी छापा मारला असता तीन एके-४७ रायफल आणि ५ हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले होते.
दरम्यान भारतात प्रजासत्ताक दिनी घातपात घडवण्याचा या दहशतवाद्यांचा डाव होता, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. अटक करण्यात आलेल्या देविंदर सिंग याचे पोलीस विभागातून निलंबन करण्यात आलं आहे. सोबतच लष्करविरोधी कारवाई केल्याने त्याला देण्यात आलेले सर्व मेडल्स परत घेण्यात आले आहेत.