औरंगाबाद – अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत देण्यास शासन कटीबध्द असून शेतकऱ्यांच्या शासन सदैव पाठीशी असल्याची ग्वाही पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात दुरदृष्य प्रणालीव्दारे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीपिकांचे नुकसान, जिवितहानी तसेच देण्यात येणाऱ्या तातडीच्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, प्रशांत बंब, रमेश बोरनारे, उदयसिंह राजपुत, प्रदीप जैस्वाल, अतुल सावे दूरदृष्य प्रणालीव्दारे तर जिल्हाधिकारी सुनील चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नीलेश गटणे, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल आदी अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, सर्व परिस्थितीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे स्वत: लक्ष ठेवुन आहेत. लवकरच विमा कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेणार आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून शासन सदैव शेतक-यांच्या पाठीशी असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आणि तातडीने देण्यात आलेल्या मदतीची माहिती पालकमंत्री यांना दिली. जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात 1 जुन ते 28 सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा 160 टक्के पाऊस पडला आहे. पावसामुळे 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांचे 4 लाख 31 हजार 928 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 740 किलोमीटर रस्त्यांचे नुकसान झाले असून 83 पुल वाहुन गेले आहेत. 3 शासकीय इमारतींचे तर 7 जिल्हा परीषद शाळांचे नुकसान झालेले आहे. 17 तलाव फुटल्याने 293 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. अशा नुकसान भरपाईसाठी अंदाजे 357 कोटींची मदत अपेक्षित असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्री यांना सांगितले.
यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी महाराष्ट्र राज्यासाठी नेमण्यात आलेल्या पीक विमा कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दिल्लीत बैठक घेतली असल्याचे सांगुण ते म्हणाले की जिल्ह्यातील नागद धरण फुटल्याने शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ द्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर खासदार इम्तियाज जलील यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासनाने खंबीरपणे उभे राहुन त्यांचे मनोबल वाढवावे आणि झालेल्या नुकसान भरपाईसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी असे सांगितले. यावेळी आमदार प्रशांत बंब यांनी शेतकऱ्यांना पीक विमा मिळताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या आत पिक विमा कंपन्यांना कळविण्याच्या नियमांची पुर्ती करताना अनेक अडचणी येत असून ही अट शिथील करण्याची विनंती पालकमंत्र्यांना केली. आमदार हरीभाऊ बागडे यांनी जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पंचनामे करण्याबाबत प्रशासनाला निर्देश देण्याची मागणी यावेळी केली. आमदार प्रदीप जैस्वाल यांनी शहरात झालेल्या नुकसान ग्रस्तांसाठी देखील तात्काळ मदत उपलब्ध करुन देण्याबाबत सुचविले.