कराडात जुनी पेन्शन योजना मागणीवरून सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडला ठिय्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसह विविध मागण्यांसाठी पालिका, आरोग्य, शिक्षणसह विविध विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांकडून आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी कराडमधील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय इमारतीबाहेर ठिय्या मांडत आंदोलन केले. “जोपर्यंत सरकारकडून जुनी पेन्शन योजना लागू केली जात नाही तसेच आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नसल्याची भूमिका संतप्त आंदोलक कर्मचाऱ्यांनी मांडली आहे.

जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी काल (14 मार्च) पासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. यात मंत्रालय, नगरपालिका, जिल्हा कार्यालय, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी सरकारी सेवा ठप्प ठेवत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कराड येथील जवळपास सर्व विभागातील शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आज आक्रमक पावित्रा घेतला. कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत येथील प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या मांडला. यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी जुन्या व नव्या पेन्शन योजनेतील फरक व त्यामुळे होणारा कर्मचाऱ्यांचा तोटा याबाबत माहिती दिली.

यावेळी एका महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी सांगितले की, खरं तर जुनी पेन्शन योजना शासनाच्या तिजोरीतून राबविली जाते. त्यामानाने जर नवीन पेन्शन योजनेचा विचार केला तर आमच्याकडून शासन दरमहा पगारातून 10 टक्के रक्कम कापून घेते. तसेच शासन त्यामध्ये 14 टक्के घालते. अशी हि जी रक्कम आमची आयुष्यभर नोकरीच्या सेवेतून साठली जाते. त्या रक्कमेत 80 टक्के परतावा शासन आम्हाला निवृत्तीच्यावेळी देणार असून जी 20 टक्के रक्कम बाकी राहील ती शासन आमच्या मार्फत शेअर बाजारात गुंतवणार आहे. आणि शेअर बाजारातील जो चढाओढ होईल यावरती आम्हाला किती पेन्शन दिली जाईल हे शासन ठरवणार आहे. ज्या दिवशी शेअर मार्केट गडगडले त्या महिन्यात आम्हाला शासन तुटपुंजी पेन्शन देणार आहे. त्यामुळे शासनाच्या या भूमिकेविरोधात आम्ही सर्व कर्माचारी आंदोलन करत आहोत. आणि आम्हाला जुनी पेन्शन लागू करावी यासाठी आमही आग्रही आहोत. आमच्याकडूनच रक्कम घेऊन आम्हाला शासन तुटपुंजी रक्कम देणार आहे. म्हणून आम्हाला जुनी पेन्शन हवी आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/604144081564834

शासनाच्या जुन्या व नवीन पेन्शन योजनेबाबत कर्मचाऱ्यांकडून केल्या जात असलेल्या आंदोलनाचे पडसाद सातारा जिल्ह्यातही उमटले. सातारा जिल्ह्यातील सुमारे 13 हजारहून अधिक सरकारी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर आता कर्मचाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार कार्यालयासमोर कामबंद आंदोलन सुरु केले आहे.