कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
युक्रेन- रशिया युध्दाबाबत खरी परिस्थिती काय आहे. युध्द परिस्थीतीच्या प्रश्नावर नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक पार्लमेंटमध्ये बोलविली पाहिजे होती. एक देश म्हणून सर्वांनी युध्द परिस्थितीस विश्वासाने सामोरे गेले पाहिजे होते. भाजप, काॅंग्रेस किंवा राष्ट्रवादी म्हणून नव्हे परंतु यामध्ये सरकार कमी पडत आहे. शेवटी आता तो मनोवृत्तीचा प्रश्न असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
कराड येथे युक्रेन येथून सुखरूप परत आलेली विद्यार्थींनी प्रतिक्षा अरबुणे हिने आज माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. तसेच आभारही मानले. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. युक्रेन येथे अजूनही विद्यार्थी अडकले असून तेथील परिस्थीती अंत्यत वाईट असल्याचे प्रतिक्षा अरबुणे हिने सांगितले.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राष्ट्रीय प्रश्न किंवा प्रकल्प असेल तर त्यामध्ये सर्वांच योगदान आहे. त्यामध्ये एकट्याचे काही नसते, परंतु क्रेडिट कोणी घ्यायचे. एकट्या व्यक्तीचे क्रेडिट असल्याचे जे काही रंगविले जाते, ते चुकीचे आहे. युध्दाबाबत खरी परिस्थिती काय आहे, ती खासगीपणे संसद सदस्यांना सांगायला पाहिजे होती. काही गोष्टी जाहीरपणे उघड करता येणार नाहीत, परंतु संसद सदस्य व जेष्ठ नेत्यांना सांगणे करणे गरजेचे होते.