‘लॉकडाऊनच्या नावाखाली सरकार जबाबदारी झटकतेय’ : राधाकृष्ण विखे पाटील यांनी साधला निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ‘कोरोना नियंत्रणासाठी केवळ लॉकाडाऊन हा पर्याय नाही. टास्क फोर्सने आरोग्य सुविधांच्या मुलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायला हवे. लॉकडाऊन लावण्यापूर्वी मदतीचे पॅकेज जाहीर केले पाहिजे. हे सर्व सोडून लॉकडाऊनच्या नावाखाली राज्य सरकार आपली जबाबदारी झटकत आहे,’ असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

शिर्डी येथे आढावा बैठक घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. विखे पाटील म्हणाले, ‘सरकारच्या उदासिनतेमुळे रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत, ऑक्सीजनची सुविधा मिळत नाही. रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. सरकारचे निर्णय फक्त कागदोपत्री असून अंमलबजावणी मात्र शून्य आहे. हे सरकार सर्व पातळ्यांवर गोंधळले असल्याने कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. हा निर्णय करणाऱ्या टास्क फोर्सचे अधिकारी मंत्रालयात बसून सरकारला सूचना करीत असतील तर ते उचित नाही.

या अधिकाऱ्यांनी कोणत्या जिल्ह्यात जावून वास्तव परिस्थिती जाणून घेतलीॽ ग्रामीण भागातील प्रश्नांची मंत्रिमंडळात चर्चा होताना दिसत नाही. मंत्र्यांची विधाने फक्त शहरी भागाची काळजी दाखवणारी आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाचे मोठे नुकसान होणार आहे. याची किंमत सरकारला मोजावी लागेल. करोनामुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, सामान्य व्यापारी, बारा बलुतेदार, सलून चालक आर्थिक संकटात भरडला गेला आहे. आता पुन्हा त्यांच्यासमोर लॉकडाऊनमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा टास्क फोर्स विचार करत नाही. या सर्व घटकांना मदतीचे पॅकेज जाहीर करावे,’ अशी मागणीही विखे पाटील यांनी केली.

Leave a Comment