कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पश्चिम महाराष्ट्रात पावसाने मोठे नुकसान केले आहे. सरकार पावसातील नुकसानीची भरपाई ही बाधितांच्या बॅंक खात्यावर जमा करणार आहे. परंतु ज्यांचे बँकते खाते नाही अशा बाधितांना शासनाने मदतीची रोख रक्कम दिली पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली आहे.
कराड तालुक्यातील काले, नांदगांव, उंडाळे, टाळगांव, येळगांव, बांदेकरवाडी, कोळे, आणे, येणके, पोतले या भागातील नुकसान ग्रस्त भागाची माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे विद्यमाना आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी पाहणी केली. त्यावेळी ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, प्रा. धनाजी काटकर, बाजार समितीचे सभापती महादेव देसाई, पै. नाना पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, शिवराज मोरे, राहूल चव्हाण, प्रातांधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अमरदीप वाकडे आदी उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने जो काय निर्णय घेतला आहे, तो ज्यांची बँक खाती आहेत. त्यांना थेट मदत देण्यास काहीच अडचण नाही. मात्र ज्यांची बँक खाती नाहीत, त्यांना शासनाने रोख रक्कम दिली पाहिजे. शासकीय यंत्रणेने नुकसान ग्रस्ताचे पंचनामे तातडीने पूर्ण करून लोकांना मदत मिळवून द्यावी. लोकांना मदत मिळण्यासाठी काही मदत लागण्यास मी स्वतः लक्ष घालेन. या भागातील बाधितांना मदतीचे वाटप केले, तसेच अधिकाऱ्यांना बाधित लोकांना लवकरात लवकर मदत देण्याच्या सूचनाही दिल्या.