कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
शेती पंपासाठी पूर्वी प्रतियुनिट 1 रुपये 16 पैसे दर आकारला जात होता. तो आता प्रतियुनिट 4 रुपये 35 पैसे आकारून शेतकऱ्यांची मोठी लूट केली जात आहे. शिवाय यात करवाढ लादलेली असून, शेतीपंपाच्या बिलासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे शेतीपंपासाठी आकारला जाणार दर पूर्वीप्रमाणेच प्रतियुनिट 1 रुपये 16 पैसे दरानेच बिल आकारावे. महापुरामुळे सहकारी जलसिंचन योजनांचे मोठे नुकसान झाले असुन शासनाने त्यांनाही मोठी मदत करुन पूरग्रस्तांना तातडीने अर्थसहाय्य मिळावे, अशी मागणी डॉ. अतुल भोसले यांनी सरकारकडे केली आहे.
भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली कराड मध्ये वीजदरवाढ तातडीने रद्द करावी तसेच शेतकरी व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत, शेतकऱ्यांचा मुक मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन महावितरणचे अधिकारी व कराड तहसिलदार यांना देण्यात आले. यावेळी कृष्णा सरकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, धनाजी पाटील, उमेश शिंदे, संचालक सयाजी यादव, मकुंद चरेगांवकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
सरकारने मार्चपासून सबसिडी बंद केल्याने 4 रूपये 35 पैसै प्रमाणे प्रतियुनिट बिल येत आहे. शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडण्याची भूमिका घेत आहे, तेव्हा असे अनुचित पाऊल उचलू नये. कोरोना, पूराच्या संकट येवून गेले असल्याने वीज कनेक्शन तोडल्यास शेतकरी संकटात सापडू शकतो. तेव्हा सबसिडी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने करावे. पूरग्रस्त शेतकऱ्यांनाही मदत देण्यात यावी. महात्मा कृषी फुले योजनेतून नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजार रूपये राज्य सरकार देणार होते, लवकरात लवकर द्यावे.