Pune News : चांदणी चौकातील तिढा काय सुटेना; आता सरकार बांधणार पादचारी पूल

Chandani Chowk
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने कोट्यावधी रुपयांचा खर्च करून पुण्यातील चांदणी चौकातील (Chandani Chowk) वाहनांच्या गर्दीला वाट देण्याचा प्रयत्न केला आहे. चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी नवीन पूल आणि अंडरपास बनवण्यात आले. पण ह्यातून वाहनांची गर्दी कमी झाली पण पादचारी लोकांना चांदणी चौकात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आता त्यावर मात करण्यासाठी सरकार लवकरच चांदणी चौकात पादचारी पूल बांधणार आहे.

पादचारींसाठी पूल बांधण्याचे आदेश

पादचारी लोकांना होणारी अडचण दूर करण्याच्या उद्देशातून पुणे महानगर पालिकेने नवा प्रस्ताव राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाकडे ठेवला आहे. त्यावर बैठक होऊन मग चांदणी चौकात परत एकदा कामाला सुरवात होईल असा अंदाज आहे. प्रस्तावानुसार चार किलोमीटर लांबीचा पादचारी मार्ग बांधण्यात येईल. तसेच पादचारी मार्गाबरोबरच पादचारी पूलही उभारण्यात येणार असून, त्याबाबतचा आराखडा महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. चांदणी चौकात पादचारी रस्ता तयार करणे, महामार्ग ओलांडण्यासाठी पादचारी पूल उभारणे तसेच पादचारी पुलावर ये-जा करण्यासाठी जीने, बावधन ते कोथरूड या दरम्यान महामार्गाल समांतर पादचारी पूल तयार करणे असा हा आराखडा आहे.

पूल बांधल्यास अडचणी दूर होतील?

महापालिका आणि राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरणाच्या बैठकीत पूल बांधणी बाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. यामध्ये तयार केलेल्या आराखड्या नुसार पादचारी पूल बांधण्यात आला तर पायी चालणाऱ्या अनेक लोकांच्या अडचणी दूर होतील यात शंका नाही. मात्र पादचारी पूल बांधण्यासाठी 10 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. व पादचारी मार्ग बनवण्यासाठी 15 कोटी रुपये लागतील. म्हणजेच एकूण 25 कोटी रुपये खर्च या कामासाठी लागेल. त्यासाठी नवीन टेंडर निघेल हे वेगळेच.