हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यावर दौऱ्यावरून सध्या महाविकास आघाडी सरकारकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. दरम्यान ते तीन दिवसाच्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आज सिह्गडला भेट दिली. यावेळी त्यांनी “स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचेच नसून जगाचे हिरो आहेत, असे गौरवोद्गार काढले.
राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी हे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहे. याच दरम्यान त्यांनी सिंहगडाला भेट देत गडाची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज नवीन अवतारी पुरुष म्हणून आपल्या राजकीय जीवनात आलेले आहे. त्यांच्या युक्ती, बुद्धी, शक्तीचे गुणगान इतिहासकारांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचे अभिमान आणि स्वाभिमान आहेत.
आजच्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज व तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा इतिहास शिक्षणाच्या माध्यमातून पोहचविणे गरजेचे आहे. त्यांच्या इतिहासातून त्यांना खूप काही शिकता येईल. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा पोहचविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी सुरवातीला लोकमान्य टिळक यांच्या विश्रामधामास भेट देवून माहिती जाणून घेतली. त्यानंतर नरवीर तानाजी मालुसरे व छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.