मुंबई प्रतिनिधी | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून केंद्र शासनाकडूनही मदत घेण्यात येत आहे. उत्तम व्यवस्था उभा करणं हे सर्वात मोठं चॅलेंज प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांसमोर आहे. मात्र, प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी हे चॅलेंज स्विकारले आहे. आपण घरी होणार नाही, इतकी चांगली व्यवस्था उपलब्ध करुन देत आहोत’, असे विधान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
गेल्या पाच दिवसांपासून सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक जण बेघर झाले आहेत. तर अनेकांचा या पूरामुळे मृत्यु झाला आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. त्यामुळे संसार उध्वस्त झालेले आहेत. या पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सरकार पुरेपूर प्रयत्न करत आहे.
दरम्यान सलग सहाव्या दिवशीही कोल्हापुरात महापुरानं घातलेलं थैमान कायम आहे. पावसाचा जोर ओसरला असला तरी पुराचं पाणी मात्र ओसरलेलं नाही. त्यामुळं कोल्हापूर, सांगली आणि कराडमधल्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे .